आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यात तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावर असून जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या लक्षणांचे रुग्ण वाढले आहेत. दररोज ओपीडीत दाखल ७०० रुग्णांपैकी ३० ते ४० रुग्णांना चक्कर, उलटी, मळमळ, थकवा, अशक्तपणा यासह अन्य उष्माघाताची लक्षणे आढळत आहेत. तसेच उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होऊन आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. आजार टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात घराबाहेर जाणे टाळण्याची गरज आहे.
मार्च अखेरला कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथील एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. यामुळे आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या असून १ एप्रिलपासून जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. कक्षात चार एसी बेडची व्यवस्था असून तातडीच्या उपचाराची सुविधा केली. यंदा मे महिन्यात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे. यामुळे उष्माघाताची लक्षणे असलेल्या रुग्णांची वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज ३० ते ४० रुग्ण डॉक्टरांच्या तपासणीसाठी येत आहेत. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेताहेत. मे महिन्यातील शांत हवा आणि तीव्र सूर्यकिरणे शरीरावर परिणाम करतात. अशा परिस्थितीत भर उन्हात घराबाहेर पडल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. चक्कर येणे, मळमळ, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे यासह अन्य उष्माघाताची लक्षणे जाणवतात. लहान मुले अथवा वृद्ध व्यक्तींना उष्माघाताचा त्रास प्रामुख्याने होतो. वातावरणात उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील पाणी कमी होऊन आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. उष्माघातासह अन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडणे टाळण्याची गरज आहे.
उष्माघातापासून बचावासाठी मीठ, साखरपाणी द्यावे
उष्माघाताची लक्षणे दिसताच रुग्णास थंड पाणी पाजावे. रुग्ण असलेल्या खोलीचे तपमान थंड ठेवावे. यासाठी पंखे व कुलरचा वापर करावा. रुग्णाच्या अंगावर ओले कापड टाकावे. मीठ, साखर व पाण्याचे मिश्रण द्यावे. खूपच त्रास होत असल्यास रुग्णालयात दाखल करावे.
पुढच्या आठवड्यात पारा वाढणार
यावर्षी मागील दोन वर्षांच्या तुलनेत उन्हाळ्यात अधिक तापमानाची नोंद होत आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला पारा ४३ अंशावर असून पुढील आठवड्यात ४४ अंशावर पारा जाण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली तरी वातावरणातील उष्णता अधिक वाढणार आहे.
पुरेसे पाणी प्यावे अन् डोक्याला सुती कापड बांधून बाहेर पडावे
उष्णता वाढल्याने घामाने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ घ्यावे. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर सुती रुमाल किंवा छत्री वापरावी. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला अडवावे.
हे टाळण्याची गरज
उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत. दुपारी २ ते ४ या वेळेत स्वयंपाक करणे टाळावे. लहान मुलांना तसेच पाळीव प्राण्यांना चारचाकी वाहनात बंद करू नये. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये. चहा, मद्य, कॉफी, खूप साखर असलेल्या कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन अजिबात करू नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.