आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट संपेना:शिराढोण परिसरातील सोयाबीनवर यलो मोझॅक विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नुकसान

शिराढोण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिराढोण व परिसरात शेतकऱ्यांनी या वर्षी खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीनवर यलो मोझॅक नवाच्या विषाणूचा प्रादूर्भाव दिसून येत असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणत सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हा विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागड्या फवारणीचा खर्च वाढला असून खर्च करूनही या विषाणूपासून आपल्या शेतातील पीक वाचणार का, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

शिराढोण व परीसर हा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षा पासून उसाला पर्याय म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन या नगदी पीकाची निवड खरीप हंगामासाठी केली आहे. गतवर्षी उस पिक घेतलेल्या शेतक-यांचे मोठे हाल झाले. शेतातील उभा उस शेतकऱ्यांनी १८ते २० महिने जोपासून मिळेल त्या भावात कोणत्याही कारखन्यांना देवून टाकला. यामध्ये शेतक-यांचे मोठे आर्थीक नुकसानही झाले. या उसाच्या संकटातून सावरुन शेतक-यांनी यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची लागवड केली मात्र गेल्या काही दिवसांपासून नव्यानेच यलो मोझॅक नावाच्या विषाणूने शेतकऱ्यांची झोपच उडवली.

या यलो मोझॅक नावाच्या विषाणू मूळे सुरवातीला काही प्रमाणत सोयाबीनचे एखादे झाड पिवळे पडते व बघता बघता हा विषाणू पसरुन संपूर्ण प्लाॅटच पिवळा करुन टाकतो. या विषाणू पासून पिकांना वाचवण्यासाठी सध्या शेतक-यांची धावपळ सूरु आहे. महागडया औषधांची फवारणी करुन याला वाचवता येईल का हा प्रश्न सध्या आहे. फवारणीचा अतिरीक्त खर्च तसेच यावर्षी बियाणांचे भावही वाढल्याने शेतकऱ्यांचा खर्च तरी निघेल का याचा अंदाज मात्र आज लावता येणे कठीण झाले आहे. सोयाबीनवर पडणाऱ्या या यलो मोझॅक नावाचा विषाणूने प्रादूर्भाव केलेल्या कळंब तालूक्यातील एकुरगा शिवारातील शेतकरी रामहरी घाडगे व गवळणबाई घाडगे या श्ेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्या शेतातील ५ एकर सोयाबीनवर नांगर फिरवला. घाडगे यांनी पेरणी पासून ते आजपर्यत ९० हजारांच्या वर या पिकासाठी खर्च केला होत. परंतु यावर विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने हे उभे पिक त्यांना मोडावे लागले.

प्रतिबंधात्मक उपाय व तण
याबाबत कृषी सहायक पी.एच. गायकवाड म्हणाले की, सोयाबीन मोझॅक व यलो व्हेन मोझॅक हे विषाणुजन्य रोग आहे. वाढीच्या अवस्थेत पाने लुसलुशीत असताना सोयाबीन मोझॅक मावा किडीद्वारे प्रसार होतो.यलो व्हेन मोझॅक पाने लुसलुशीत असताना वाढीच्या अवस्थेत पांढऱ्या माशीद्वारे प्रसारित होतो.पिक शारीरीक वाढीच्या अवस्थेत असताना कोवळ्या पानावर मावा व पांढरी माशी यांचा प्रसार रोखणे आवश्यक आहे. पिक वाढीच्या अवस्थेत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे केवळ हाच उपाय आहे.या विषाणुचा प्रसार अनेक गवतवर्गीय तणातुन होतो. या तणाचे नियंत्रण करणे आवश्यक असते.सध्या पसरत असलेल्या या विषाणूचे नेमके नाव काय हे शेतक-यांनाही सध्या कळेनासे झाले आहे. या विषाणूस कोणी यलो मोझॅक तर कोणी म्हणते हळद्या. परंतु नाव काहीही असेल या विषाणूने सध्या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ मात्र केली आहे. उत्पादन खर्च वाढला असून या रोगापासून खरीप सोयाबीन वाचणार का हा येणारा काळच ठरवेल.

बातम्या आणखी आहेत...