आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जुन्या विचारांना मूठमाती देत दीराने केले विधवा वहिनीशी लग्न; तीन महिन्यांपूर्वी झाला होता भावाचा मृत्यू

करमाळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहताना दिसत आहे. कुठे विधवा प्रथा बंद करण्यासाठी अभियान व अनुकरण केले जात आहे. तर कुठे विधवा महिलांना सामाजिक सन्मान मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. तसाच पहिला प्रयत्न करमाळा तालुक्यात झाला आहे. आपल्या भावाचे अकाली निधन झाल्यानंतर विधवा वहिनीच्या पुढील आयुष्याचा विचार करून त्यांच्यासोबत संसार थाटून सामाजिक परिवर्तनाचा आदर्श ठेवला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सदरचा विवाह करमाळ्यात मंगळवारी पार पडला. स्वप्निल अशोक देशमाने (रा. बालाजीनगर, ता. करमाळा) असे दीराचे नाव आहे. सतरा वर्षांपूर्वी स्वप्निल यांचे बंधू संतोष यांचा विवाह शिराढोण (ता. कळंब) येथील आशा यांच्यासोबत झाला होता. दोघांचा सुखी संसार सुरू होता. संतोष हे टमटम चालक होते. कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर मागील तीन महिन्यांपूर्वी २६ जानेवारी रोजी संतोष यांना अचानक चक्कर येऊ लागली. या वेळी त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. उपचारादरम्यान संतोष यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नंतर आई, वडील, पत्नी व तीन भाऊ असा परिवार त्यांच्या पश्चात संतोष यांच्या शोकसागरात बुडाला. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने हा धक्का पचवणे देशमाने कुटुंबाला जड गेले.

स्वप्निल हे करमाळ्यातील व्यावसायिक आहेत. ते स्वतःसाठीही मुली पाहत होते. पण घरात दुःखाचे वातावरण असल्याने त्यांनी लग्नाबाबत विचार करणे जवळपास बंद केले होते. काही दिवसांनी स्वप्निलच्या वडिलांचे मित्र हरी माने (रा. खंडाळी, ता. मोहोळ) यांनी स्वप्निलची गाठ घेतली. त्यांना आपल्या विधवा वहिनीसोबत लग्न करण्यासंदर्भात विचार करण्यासाठी सांगितले.

या वेळी भावाच्या अकाली मृत्यूनंतर विधवा वाहिनीचे उर्वरित आयुष्य व घरातील परिस्थिती लक्षात घेऊन आयुष्यभरासाठी जीवनसाथी मिळेल, असा विचार करून स्वप्निल यांनी लग्नासाठी होकार दिला. वहिनींच्या घरच्यांना सदर लग्नाबाबत सांगितल्यानंतर त्यांनीही लगेच होकार दिला. मंगळवारी हा विवाह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने करण्यात आला. यानिमित्ताने एक सामाजिक परिवर्तनाचा संदेश या वेळी स्वप्निल व आशा यांनी दिला आहे. या वेळी घरातील मंडळींसह वडिलांचे मित्र हरी माने व सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड उपस्थित होते.

वडिलांच्या मित्रांनी दिलेला सल्ला पटला
भावाचा व वहिनीचा संसार आर्ध्यावरती मोडला होता. मी माझे लग्न करून माझ्या संसारात व्यग्र झालो असतो. पण वहिनीचे अजून पूर्ण आयुष्य पडले आहे. भाऊ गेला तो क्षण सर्वांसाठीच दुखा:चा होता. त्याच्या आठवणीत वहिनीने पूर्ण आयुष्य विधवा म्हणून घालवणे मला पटले नाही. वडिलांच्या मित्राने जेव्हा हा प्रस्ताव आपल्या पुढे ठेवला तेव्हा आपणही त्यावर संमती दर्शवली. घरच्यांनी जुन्या रुढी परंपरांना मूठमाती देऊन होकार दिला. त्यामुळे आज अशा या नव्याने आयुष्याची सुरुवात करू शकतील.''
स्वप्निल देशमाने, करमाळा

बातम्या आणखी आहेत...