आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपाची तयारी:शिंदखेडा तालुक्यासाठी कपाशीच्या साडेतीन लाख पाकिटांची मागणी; क्षेत्र वाढण्याची शक्यता, शेतकऱ्यांची तयारी सुरू

शिंदखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका अधिकारी कृषी कार्यालयातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणे मिळावे यासाठी नियोजन झाले आहे. यंदाही कपाशीची सर्वाधिक लागवड होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे कपाशीच्या ३ लाख ५७ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल वाढला आहे. यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहे. मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदाही शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे सर्वाधिक कल आहे. तालुक्यामध्ये खरीप लागवडीचे क्षेत्र १ लाख १० हजार हेक्टर आहे. त्यात २२ हजार ५५० हेक्टर क्षेत्र तृणधान्याचे, ६ हजार ४५० हेक्टर कडधान्याचे, गळीत धान्याचे २ हजार ३५० हेक्टर, कपाशीचे सर्वाधिक ६७ हजार हेक्टर, उसाचे ८०० हेक्टर असे एकूण ९९ हजार १५० हेक्टर क्षेत्र पेरणीखालील आहे.

त्यापैकी तृणधान्याची २१ हजार १०० हेक्टर, कडधान्याची ५ हजार ९०० हेक्टर, गळीत धान्याची १ हजार ६०० हेक्टर, कपाशीची ७१ हजार ५००, उसाची ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, मक्याचा समावेश आहे. त्यात बाजरी आणि मका या पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. बाजरीची ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर तर मक्याची लागवड ९ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर होणे अपेक्षित आहे. कडधान्यांमध्ये तूर, मूग, उडदाचा समावेश होतो. तालुक्यात मुगाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यंदा ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात मुगाची पेरणी होण्याची शक्यता आहे. गळीत धान्यामध्ये भुईमूग, सोयाबीन, तीळ यासारख्या पिकांचा समावेश होतो. भुईमुगाची सर्वाधिक १ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात लागवड होणे अपेक्षित आहे. तालुक्यात भूजल पातळी वाढल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे.

२३ हजार ९२ टन खत उपलब्ध
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खत वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शासनाकडे रासायनिक खतांची मागणी केली आहे. सन २०२१ मध्ये २३ हजार २९ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले होते‌. यंदा ३१ हजार ९७० मेट्रिक टन खताची मागणी कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे. त्यापैकी २३ हजार ९२ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खतांची टंचाई जाणवू नये यासाठी तालुका कृषी कार्यालयातर्फे प्रयत्न होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बियाण्यांची टंचाई जाणवणार नाही
कृषी कार्यालयातर्फे कपाशीच्या ३ लाख ५७ हजार ५०० पाकिटांची मागणी नोंदवण्यात आली आहे. याशिवाय ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्य बियाण्यांची २ हजार ३९१ क्विंटल, कडधान्य बियाण्यांची ८८५ क्विंटल, गळीत धान्य बियाण्यांची २४३ क्विंटल मागणी कृषी विभागातर्फे नोंदवण्यात आली आहे. यंदा पावसाळ्याचे आगमन मे महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

खत, बियाणे वेळेवर मिळणार
कापूस, ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग या पिकांची जास्त पेरणी होते. तूर, उडीद या सारखी पिके आंतरपिके म्हणून घेण्यात येतात. बियाणे व रासायनिक खत वेळेवर मिळावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. समस्या असल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा.
विनय बोरसे, तालुका कृषी अधिकारी

बातम्या आणखी आहेत...