आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरमशागतीच्या कामांना वेग:धडपड दमदार पावसाची गरज, रोगांच्या प्रादुर्भावाने मशागत खर्चात वाढ; पावसाची २ दिवसांपासून उघडीप, कोळपणीसह फवारणीला वेग

अंबादास जाधव । उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलैमध्ये पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. मात्र, सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके पिवळी पडली आहेत. काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आंतरमशागतीच्या कामांना वेग आला. सततच्या ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर फवारणीचे काम सुरू आहे.

उमरगा तालुक्यात खरीप हंगामाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काही ठिकाणच्या तलावात पाणीसाठा उपलब्ध होता, मात्र यंदाच्या हंगामात जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे अद्याप तलावात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला नाही. त्यामुळे ओलिताखालील क्षेत्रही आता कोरडवाहू झाले आहे. पाच मंडळ विभागात खरीप पेरण्या वेळेवर झाल्या. मात्र, पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली. परिणामी पिकांची वाढ म्हणावी तशी झाली नाही. पिकाला आधार व्हावा इतकाच पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून कडक उन्ह तर सायंकाळी रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसाने उघाड दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी अंतरमशागती बरोबरच खुरपणी व फवारणीच्या कामाला वेग दिला आहे. पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने जाता जाता थोडाफार दिलासा दिला आहे.

येणाऱ्या नक्षत्रात पाऊस होईल की नाही याची शेतकऱ्यांना शाश्वती नसल्याने पुढे येणाऱ्या आश्लेषा अन् मघा नक्षत्रात होणाऱ्या पावसावरच खरीप हंगामातील उत्पन्नाचे भवितव्य अवलंबून असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. खरीप हंगामातील पेरणीनंतर पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने जाताना शेवटच्या टप्प्यात पिकावर तुषार शिंपडल्याने व पुष्य नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांना आधार मिळाला आहे. सतत पाच दिवस पावसाची रिमझिम सुरू असल्याने पिकांमध्ये तण वाढले असून रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांनी कोळपणी, खुरपणी, औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत मजूर मिळेनासे झाले असून अडीचशे ते तीनशे रुपये मजुरी देवून तण काढणे जिकीरीचे झाल्याने बहुतांश शेतकरी तणनाशक औषधांची फवारणी करण्यास प्राधान्य देत आहेत.

सोयाबीन, अन्य पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. अशा परिस्थितीत तग धरून राहिलेल्या सोयाबीन आणि अन्य पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. किड रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी दोन हजार रुपये फवारणी खर्च येत आहे. त्यामध्ये पीक विमा भरावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुबलक पाऊस होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पुनर्वसू व पुष्य नक्षत्रात जोरदार पाऊस झाला.

महागड्या औषध फवारणीचा भुर्दंड
वातावरणातील बदलाचा परिणाम होवून गोगलगायी, पाने कुरतडणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता महागड्या औषधांची खरेदी करून फवारणी करावी लागत आहे. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून संगोपनासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागत आहे. अगोदर पाऊस नाही, त्यात रोगांचा प्रादुर्भाव महागडी औषधी खरेदी करत फवारणी करावी लागत आहे. येणाऱ्या काळात जोरदार व समाधानकारक पाऊस झाला नाही तर शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...