आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:हासेगाव, ईटकूर, पारा रस्त्यांची कामे सुरू करण्याची मागणी

कळंब9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हासेगाव, ईटकूर, पारा या मंजूर असलेल्या रोडवरील स्थगिती उठवून काम चालू करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी २३ नोव्हेंबर रोजी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हासेगाव, ईटकूर, पारा हा रस्ता २०२१ च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यासाठी एक कोटी ३० लाख रुपये २०२१-२२ मध्ये मंजूर झाले होते.

परंतु या रस्त्याच्या कामाला सरकारने स्थगिती दिल्याने कामाची पुढील कार्यवाही थांबली आहे. हा रस्ता कळंब व वाशी यो दोन तालुक्याच्या ठिकाणाला जोडला गेला आहे. त्यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच चोराखळी येथील धाराशिव शुगर, हावरगाव येथील डी. डी. एन. शुगर, वाशी येथील शिवशक्ती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची ये-जा या रस्त्यावरून आहे. लगतच्या बीड जिल्ह्यात जाण्या-येण्यासाठी देखील याच जिल्हा मार्गाचा उपयोग होतो.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच या मार्गावर ईटकूर आणि पारा हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र असुन या आरोग्य केंद्राशी परिसरातील २० पेक्षा अधिक गावे जोडली गेली आहेत. या गावातील गरोदर मातांना प्रसुतीदरम्यान धोका पत्करून दवाखाना गाठावा लागतो. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विविध गावांतील सहा लोकांना जीव गमवावा लागला आहे. मंजूर कामास स्थगिती देऊन सामान्य माणसाच्या जीविताशी खेळणाऱ्या राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

दरम्यान, रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कळंब बसस्थानक, ईटकूर, हासेगाव, वाकडी, हावरगाव, कोठाळवाडी, गंभीरवाडी, बोरगाव या गावातील नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. एकीकडे परिसरात उद्योग, व्यापार आणि पर्यटन वाढत असताना रस्ते चांगले असणे महत्वाचे आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. निवेदनावर शिवसेना उप तालुका प्रमुख भारत सांगळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण आडसुळ, बाळासाहेब गंभीरे, दत्ता सावंत, अशोक आडसुळ, प्रा. दिलीप पाटील, चक्रधर कोल्हे, पप्पू लंगडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...