आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण सुसाट:मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही परिणाम शून्य, वसुलीसाठी 1880 वीज जोडण्या तोडल्या

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वजन फिल्डवर, कार्यालये पडली ओस

तालुक्यातील तेर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात महावितरणच्या सक्तीच्या वीज वसूलीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकरात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. मात्र, ना मंत्रिमंडळात निर्णय झाला ना वसूली थांबली. महावितरण सध्या वसूलीसाठी जोमात असून आतापर्यंत १८८० जोडण्या तोडल्या आहेत. कृषीपंप वगळता बाकी ४२७ कोटींवर गेली असून केवळ १४.३० कोटी वसूल झाले असल्याने यापुढेही दणक्यात वसुली होणार असल्याचे दिसत आहे.

तेर येथे गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी मागणी केल्यामुळे महावितरणच्या सक्तीच्या वसुली मोहिमेबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री राजेश टोपे यांनी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत दिले होते. टोपे यांचे मंत्रिमंडळात मोठे वजन असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सभामंडपात त्यांनी असे आश्वासन देऊन मोठ्या टाळ्याही मिळवल्या. परंतु, सर्वच अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. राज्य सरकारकडून कोरोना काळातील थकलेल्या बीलांबाबत काहीच निर्णय न झाल्यामुळे महावितरण जोमात वसूली करत आहे. जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सेवा असे मिळून एक लाख २० हजार ७९१ ग्राहकांकडे तब्बल ४२७ कोटी ३६ लाख रुपये थकले आहे. संबंधित १०० रुपयांपेक्षा अधिक थकीत रक्कम असलेल्या ग्राहकांना वीज तोडण्याच्या नोटीसही दिल्या आहेत. त्यानुसार वारंवार सूचना देऊनही रक्कम न भरणाऱ्या १८८० ग्राहकांची वीज तोडण्यात आली आहे. यापैकी ९२० जणांची कायमस्वरूपी वीज तोडली.आतापर्यंत केवळ १४ कोटी ३० लाख रुपये वसूल करण्यात महावितरणला यश आले. मोठा पल्ला गाठायचा असून महावितरणचा वेग आणखी वाढणार आहे.

एकूण थकबाकी ४२७ कोटी, आतापर्यंत मिळाले केवळ १४.३० कोटी

फक्त आश्वासने, शासनाकडून नागरिकांना दिलासा नाहीच
कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. अनेक दुकाने बंद होती तर नागरिकांचा रोजगार हिरावला गेला होता. त्यावेळी महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही वीजबिल माफिबाबत वक्तव्य केले होते. परंतु, राज्य सरकारकडून याबाबत अखेरपर्यंत काहीही दिलासा मिळू शकला नाही. विरोधी पक्षांचे नेतही गप्प बसून आहेत. याचा भार आता पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांच्याच डोक्यावर पडला आहे.

वीज तोडल्यामुळे पाणी असूनही टंचाईची परिस्थिती
यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांसह सार्वजनिक कूलपनलिका, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. मात्र, वीज तोडण्यात आल्याने वीजपंप बंद आहेत. यामुळे पाणी मिळण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात १६२४ पाणीपुरवठा योजना आहेत. ८१ कोटी ९५ लाख चालु थकबाकी आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वसूली मोहीम राबवण्यात येत आहे.

तालुकानिहाय प्लॅन, टार्गेट
महावितरणचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी वसुलीसाठी सर्वच कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. तालुकानिहाय प्रत्येकाला प्लॅन व टार्गेट देण्यात आले आहे. वसुलीसाठी केवळ लाइनमनच नव्हे तर कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंत्यांसह सर्वच अधिकाऱ्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सांगितले आहे. तसेच लिपिकवर्णिय कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी पिटाळण्यात येत आहे. यामुळे सध्या महावितरणची कार्यालये ओस पडली आहेत. सर्वजण सकाळीच गावे गाठत आहेत.

पाण्यासाठी होणार भटकंती
सध्या ग्रामपंचायतींची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यात महावितरणने वसुलीसाठी पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांची वीज तोडली तर अनेक दिवस ती पूर्ववत होणार नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी जादा दिवस भटकंती करावी लागणार आहे. तसेच रस्त्यावरच अंधार पडल्यामुळे चोऱ्यांचे प्रकार आणखी वाढणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतींची जबाबदारी आणखी वाढली आहे.

थकबाकीचा आकडा सातत्याने फुगतोय
{विविध योजनांची एकूण १ लाख २० हजार ग्राहकांकडे ४२७ कोटी रुपयांची थकबाकी.
{ग्राहकांनी अनेक दिवस बिल न भरल्याने विजेच्या थकबाकीचा आकडा फुगत गेला.
{१ लाख घरगुती ग्राहकांकडे ५३.३२ कोटी थकबाकी असून मागे ४९ कोटी होती.
{सर्वाधिक थकबाकी २६८ कोटी पथदिव्यांची असून याची वीज कापल्यावर सर्वत्र अंधार.
{वसूली मोहिमेच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये केवळ १४ कोटी ३० लाख रुपये वसूल झाले.
{२५ टक्केही वसूली न केल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पुढील काळात होतील कारवाया.

बिल भरून ग्राहकांनी सहकार्य करावे
ग्राहकांनी वीजबील भरून सहकार्य करण्याची गरज आहे. महावितरणच सध्या संकटात आहेत. वीजनिर्मितीचा खर्च वाढत जात आहे. तसेच अन्य खर्चासाठी वसूली करणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावे. श्रीकांत पाटील, अधीक्षक अभियंता.

बातम्या आणखी आहेत...