आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांना सुविधा:तुळजापूरचा विकास आराखडा, पथक करणार तिरुपतीचा दौरा

तुळजापूर / प्रदीप अमृतराव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरूपती बालाजी’च्या धर्तीवर तीर्थक्षेत्र तुळजापूरचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंदिर संस्थानचे पथक अभ्यासासाठी दोन दिवस तिरुपतीला भेट देणार आहे. या पथकात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह मंदिर संस्थान, पालिका अभियंता, सल्लागार कंपनीचा समावेश असणार आहे.

मंदिर संस्थानचे पथक मंगळवारी (दि.२२) तिरुपती बालाजी येथे जाण्यासाठी निघणार आहे. सध्या तुळजापूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनी स्ट्रकवेल प्रा. ली. (नवी मुंबई) चे अभियंता काम करताहेत. सल्लागार कंपनीला जानेवारी २०२३ अखेर विकास आराखडा सादर करण्याची मुदत दिली आहे. दरम्यान भाविकांना सुविधा देताना स्थानिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. दरम्यान, विकास आराखड्यात भाविकांच्या मनोरंजनाचा विचार केला आहे. रामदरा तलाव येथे बोटिंगची सुविधा असेल. घाटशीळ ते पापनाश रोप वे प्रस्ताव विचाराधीन आहे. रखडलेल्या पापनाश तलावाचे सुशोभीकरण आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करणार आहेत.

वर्षभर उपयोगी सुविधा पुरातत्व विभागाच्या मान्यतेस अधीन राहून तुळजाभवानी मंदिरात प्रवेश तसेच बाहेर पडण्याच्या पर्यायी मार्गासह मंदिर परिसर मोठा करण्याचा प्रयत्न आहे. भाविकांच्या सुविधेसाठी पार्किंग, रस्ते रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शहरात ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येणार आहे. केवळ नवरात्र नव्हे तर वर्षभर उपयोग होईल, अशा सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर आहे.

कोचर आयोगाच्या शिफारशी महत्त्वाच्या
मांढरदेवी दुर्घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने न्यायमूर्ती कोचर आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने संपूर्ण राज्यातील देवस्थानांसाठी शिफारशी सादर केल्या असून या शिफारशी विकास आराखडा तयार करताना विचारात घेण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...