आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंतनाशक दिन:10 ऑक्टोबरला जंतनाशक मोहीम; आराेग्य विभागाला मदत करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जंतनाशकामुळे बालकांची आकलन शक्ती सुधारणे, अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढणे, दीर्घकाळ काम करणे आणि अर्थार्जनाची क्षमता वाढण्यासह अन्य बाबींसाठी मदत होते. यासाठी जंतनाशक दिनानिमित्त १ ते १९ वयोगटातील मुलांना १० ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. याचा ग्रामीण भागातील ३ लाख १८ हजार ३११ तर शहरी भागातील १ लाख ३१ हजार ७३४ असे जिल्ह्यातील एकूण ४ लाख ५७ हजार ४५ लाभार्थींना जंतनाशक गोळी देवून जंतापासून संरक्षित करण्यात येणार आहे.

राज्यात १० ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन आणि १७ ऑक्टोबर २०२२ रोजी मॉप अप दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सर्व १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी शासकीय, निमशासकीय, खासगी शाळा, अनुदानित शाळांमधून आणि सर्व अंगणवाड्यांमधून कोव्हीड- १९ मार्गदर्शक सूचनांचे अवलंब करून आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मार्फत राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलिस निरीक्षक व्ही. एस. जैस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. पाटील, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी (वा.सं.) डॉ. सुशील चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (मा.) रत्नमाला गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण बी. एच. निपाणीकर, सहा. संचालक (कुष्ठरोग) डॉ. रफीक अन्सारी, डॉ. दीपक मेंढेकर, डॉ. अतुल घोगरे, डॉ. गजानन परळीकर, डॉ. उज्वला कळंबे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले की, जंतनाशकाची गोळी सर्वांसाठी मोफत आणि प्रभावी असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांना देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच सर्व संबंधित शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादींनी समन्वयाने मोहिम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन डॉ. ओंबासे यांनी केले.

प्रास्ताविक करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकूडे यांनी सभागृहास सांगितले की, राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा उद्देश हा १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा आणि अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी चावून खाण्यासाठी देवून त्याचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.

फळ, भाज्यांचे निर्जंतुक अन् स्वच्छता महत्वाची
यावेळी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की, जंतसंसर्ग थांबवण्याकरिता हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, पायात चपला किंवा बुट घालणे, निर्जंतुक आणि स्वच्छ पाणी पिणे, अन्न व्यवस्थित शिजवून खाणे, निर्जंतुक आणि स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुणे, नखे नियमित कापणे आणि शारीरिक स्वच्छता ठेवणे इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण देणे हा जंतसंसर्ग टाळण्याचा उपाय असल्याचे सांगून जंतनाशक गोळीच्या सेवनाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे उपस्थितांना सांगितले.पावसाळयाच्या काळात बाहेरचे खाताना पदार्थ चांगल्या तेलात तळलेले आहेत का याचीही खात्री करून घेणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...