आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील पहिला प्रयोग:धाराशिव साखर कारखाना करणार इथेनॉलपासून ऑक्सिजनची निर्मिती; आठ दिवसांत प्रकल्प कार्यान्वित होणार

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दररोज 20 टन ऑक्सिजनची निर्मिती, वसंतदादा इन्स्टिट्यूटकडून मान्यता; कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर पर्याय काढण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आवाहन केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यात या प्लँटचे काम सुरू झाले असून, आठ दिवसांत हा प्रकल्प पूर्ण होऊन दररोज साधारण २० टन ऑक्सिजन उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मीटिंग घेतली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजित पाटील सहभागी झाले होते. सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत असून, दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. बैठकीत व्हीएसआयकडून तातडीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पांत जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत माॅलेक्युलर सीव्ह वापरून हवेतील वायूद्वारे ऑक्सिजन निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाऊ शकते, अशी मांडणी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केली. त्यानंतर या मीटिंगमध्ये तत्काळ असा प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारखान्याने काम हाती घेतले असून, आठ दिवसांत कारखान्यातून दररोज १६ ते २० टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचे चेअरमन पाटील म्हणाले. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प हाती घेतला. कारखान्यास ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या देण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. कारखान्याने त्वरित पायलट प्रकल्प कार्यरत करावा, असे सांगितले. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरिंग टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला दररोज १५ टन ऑक्सिजनची गरज
उस्मानाबाद जिल्ह्याला सध्या दररोज १५ टन ऑक्सिजनची गरज लागते. पुण्यासह अन्य भागातून अत्यंत कसोशीने ऑक्सिजन उपलब्ध करावा लागत आहे. ऑक्सिजनअभावी प्रशासनाची तसेच सरकारी व खासगी दवाखान्यांची कसरत सुरू आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना बेडची कमतरता भासत आहे, या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सुरू झाल्यास जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागून मोठी समस्या सुटू शकते. त्यामुळे कारखान्यातील हा प्रकल्प तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...