आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसरपंचाने केला आत्मदहनाचा प्रयत्न:धारूर ग्रामपंचायत उपसरपंचाने पंचायत समितीतच केला आत्मदहनाचा प्रयत्न, ऐनवेळी पोलिसांनी घेतले ताब्यात

हरेंद्र केंदळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर ग्रामपंचायतमध्ये कामांचे पैसे उचलून कामे नसल्याचा आरोप उपसरपंच गणेश जगताप यांनी केला होता. कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रशासनाने करवाई केली नाही. त्यामुळे गुरुवारी जगताप यांनी उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये डीझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आनंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वेळीच जगताप यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

याबाबत जगताप यांनी दिलेल्या निवेदनानुसार ग्रामपंचायतमध्ये सन २०१८-१९ गावा अंतर्गत सार्वजनीक पाणी दुरुस्ती व अन्य कामे, पुरवठा योजनेतून केल्याचे सांगत पैसे उचलेले प्रत्यक्षात कामेच झाली नाही. सन २०१९-२० मागासवर्गीय वरतीमध्ये बोरवेल मोटारीसहीत पाईपलाईनचे काम, सन २०१९-२० गावा अंतर्गत नवीन पाईप व अन्य दुरुस्ती, सन २०१८-१९ ग्रामपंचायत कार्यालय इंटेरियर डिझाईन करणे व विद्युत पुरवठा करणे. सन २०१८-१९ अंगणवाडीत खेळणी व इतर साहित्य पुरविणे. सन २०१९-२० अंगणवाडीत खेळणी, कारपेट व इतर साहित्य पुरवणे. सन २०१९-२० जि.प.शाळेत संगणक व इतर साहित्य पुरविणे, सन २०१७-१८ शाळेसाठी ई-लर्निंग व आवश्यक साहित्य पुरवणे व डिजिटील क्लासरुम तयार करणे या कामासाठी लाखो रुपयांची तरतूद होती. हा निधी उचलण्यात आला. मात्र, कामेच केली नाही. तक्रार केल्यावर काही कामे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कामे न करता उचलेल्या पैशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचेही त्यांनी सांगितले. याची चौकशी करून कारवाईची मागणी दोन सप्टेंबर रोजी लेखी तक्रार वजा आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

कोणतीच कारवाई झाली नसल्याने त्यांनी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी समयसुचकता दाखवून त्यास ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक बी. के. बलैय्या, आ. जी. करंडे, व्ही. ए. चौधरी, बी. एस. देडे, गुप्तचर विभागाचे के. पी. मुंढे यांनी त्यास ताब्यात घेतले.

चौकशी केली, संबंधितांना आदेश
मे अखेरीस या पूर्ण तक्रारींची तपासणी करण्यात आली आहे. विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी केली. अहवाल तयार केला. त्यात काही दोष आढळला नाही. हा अहवाल त्यांना मान्य नाही. त्यामुळे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांनी दिली आहे.

सकाळी 9 वाजेपासून पोलिसांचा ठिय्या
सकाळी नऊ वाजेपासून पोलिसांकडून पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडला होता. दुपारी एकच्या दरम्यान जगताप डिझेलची कॅन घेऊन आला होता. त्यास तत्काळ ताब्यात घेतले. दुपारी सव्वादोन पर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...