आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद ढोकी ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दिग्गज व दिग्गजांचे वारसदार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.सहा प्रभागात १७ उमेदवार ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडून द्यायचे असून १७ जागांसाठी ६८ उमेदवार रिंगणात आहेत.
चौरंगी लढत होत असून सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. या ठिकाणी कै. किसन समुद्रे बहुजन ग्रामविकास पॅनेलकडून सरपंचपदासाठी अश्विनी प्रशांत माळी, ढोकी ग्रामविकास आघाडीकडून उषा अमर माळी, भाजप प्रणित डॉ. पद्मसिंह पाटील बहुजन ग्रामविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य मीना श्रीहरी माळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रणित तानाजीराव सावंत, ग्राम विकास आघाडीकडून पूजा अच्युत डोलारे हे सरपंचपदाचे उमेदवार आहेत.
आम आदमी पक्ष, मनसे व एमआयएम सुद्धा रिंगणात आहे. सत्ताधारी कै. किसन समुद्रे ग्रामविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिवंगत नेते कै. नारायण समुद्रे यांच्या पत्नी शोभा नारायण समुद्रे (प्रभाग क्र.१), नहुषराज नारायण समुदे (प्र.३), पॅनल प्रमुख अमोल अनंतराव समुद्रे (प्र.४), माजी ग्रामपंचायत सदस्य शकील काझी यांच्या पत्नी आशियाबेगम शकील काझी या प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवत आहेत.
ढोकीचे माजी सरपंच गुणवंत देशमुख व गफार काझी यांच्या ढोकी ग्रामविकास आघाडीकडून माजी सरपंच गुणवंत महिपतराव देशमुख (प्रभाग-४) निवडणूक लढवत असून त्यांचे चिरंजीव राजपाल गुणवंत देशमुख (प्रभाग-३) मधून लढत आहेत. जिल्हा मजुर फेडरेशनचे माजी चेअरमन व माजी सरपंच गफार काझी यांच्या पत्नी कौसरबेगम गफार काझी (प्रभात-एक), अबरार अब्बासअली काझी (प्रभाग दोन), सुलतान बु-हानोद्दीन काझी (प्रभाग सहा) निवडणूक लढवत आहेत.
भारतीय जनता पार्टी प्रणीत राणाजगजितसिंह ग्रामविकास बहुजन पॅनलच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निहाल काझी प्रभाग चार मधून निवडणूक लढवत असून त्यांच्या पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्या रेश्मा निहाल काझी या प्रभाग क्रमांक पाच, भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रमोद देशमुख प्रभाग क्रमांक दोन, माजी ग्रामपंचायत सदस्य बारीसाहेब काझी यांचे चिरंजीव परवेज काझी प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवत आहेत.
प्रा. तानाजीराव सावंत प्रणीत ढोकी बहुजन ग्रामविकास आघाडीकडून भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जीवन देशमुख (प्रभाग चार), पैलवान संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश पंडित वाकुरे(प्रभाग सहा), दत्ता तिवारी( प्रभाग तीन) गुणवंत देशमुख यांच्या पत्नी शामल गुणवंत देशमुख (प्रभाग एक) तसेच सेवानिवृत नायब तहसीलदार पंढरीनाथ आवटे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
११ हजार ४५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सर्वच उमेदवारांनी कोपरा सभा व प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे. भाजप प्रणित पॅनलकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर सभा झाली आहे. तसेच इतर आघाड्यांनी बाहेरच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला न बोलवता स्थानिक पॅनल प्रमुखांनी सभा घेतल्या आहेत. ढोकी ग्रामपंचायतीसाठी ११ हजार ४५३ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार ६०६९ तर महिला मतदार ५३८४ आहेत. हे मतदार रविवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.