आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडिझेलच्या घाऊक दरात वाढ झाल्याने महामंडळाला खासगी पेट्रोल पंपापेक्षा २४ रुपये जास्तीच्या दराने डिझेल विकत घ्यावे लागत होते. परिणामी दिवसाला तीन लाख ५५ हजार २०० रुपये जास्तीचे मोजावे लागत होते. गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व आगाराच्या बसेस आता खासगी पंपावर डिझेल भरून घेत असल्याने होणारा तोटा कमी झाला. सद्या सुरू असलेल्या बसेसला १४ हजार ८०० लिटर डिझेल लागत आहेत.
गेल्या साडेचार महिन्यापासून एसटी महामंडळाला आंदोलनाची घरघर लागली आहे. यातच पुन्हा इंधनाच्या दरात वाढत झाल्याने अगोदरच तोट्यात असलेल्या लालपरीला जास्तीचा भुर्दंड बसत आहेत. यातून मार्ग काढत शासनाने गेल्या आठवड्यात खासगी पंपावरून डिझेल भरून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आगारातील बसेसला त्यांच्या जवळच्या पंपावर डिझेल किरकोळ दराने मिळण्यासाठी चार दिवसांपासून पंपचालकांकडून कोटेशन मागवण्याचे काम सुरू होते. त्यात ज्या पंप चालकांनी किरकोळ दरातही काही प्रमाणात सवलत दिली अशा पंपावरून डिझेल भरून घेण्यास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. महामंडळाला दिवाळीपासून लागलेले ग्रहण शिमगा झाला तरी सुटण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. दिवाळीपूर्वी महागाई वाढल्याने तिकिटाचे दर वाढवले होते. त्यानंतर संप सुरू झाला. आता इंधन महाग झाल्याने पर्याय शोधून डिझेल स्वस्तात मिळवले आहे. यापूर्वी महामंडळाने २०१३-१४ या वर्षीही असा प्रयोग केला होता. घाऊक दरापेक्षा किरकोळ दर कमी असल्याने तब्बल एक वर्ष खासगी पंपावरून डिझेल खरेदी केले होते. आताही तशीच अथवा त्या पेक्षाही जास्त महाग अशी स्थिती निर्माण झाल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
मागील अनुभवामुळे आमची अडचण
सरकारी कामांची बिलं वेळेवर मिळत नाहीत. त्यात मागच्या वेळचा अनुभव असल्याने आमच्यातील फारसे जण उत्सुक नाहीत. काही जण आहेत तयार. मात्र, तितका स्टॉक करून ठेवणे, बिल घेण्यासाठी थांबावे लागते. एरवी इतर किरकोळ ग्राहक तत्काळ पैसे देऊन मोकळे होतात. दत्ता कुलकर्णी, अध्यक्ष, पेट्रोल पंप असोसिएशन, उस्मानाबाद.
खासगी पंपावर डिझेल भरणे सुरू
खासगी पंपचालकांकडून सर्व तालुक्यातून कोटेशन मागवले होते. त्यांच्यासोबत चर्चा करून ज्यांचे दर कमी, त्यांच्याकडून आम्ही डिझेल घेणार आहे. गुरुवारपासून खासगी पंपाकडून डिझेल भरण्यास प्रारंभ झाला आहे. घाऊक दर किरकोळ दरापेक्षा २४ रुपयांनी अधिक वाढले आहे. त्याचा तोटा होत होता. -अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक, उस्मानाबाद.
दृष्टिपथात विभाग
एकूण बसेस ४२९, प्रत्यक्ष रस्त्यावर १४८, एकूण आगार ६, दिवसाला लागते १४,८०० लिटर डिझेल,
दिवसाला ५५,७४० किमी धावतात, ३०,००० जणांचा रोज प्रवास
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.