आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन चोरी:डिझेल चोरी करणाऱ्यांनी दिली वाहन चोरींची कबुली ; तीन ट्रॅक्टर, दोन पिकअप व बुलेट चोरी निष्पन्न

मोहोळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यात सावळेश्वर परिसरात डिझेलची चोरी करताना पकडलेले तीन चोरटे सराईत चोरी करणारे निघाले. त्यांनी करमाळा, भूम, माढा व पुणे अशा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ ट्रॅक्टर, २ पिकअप व १ क्लासिक बुलेट असा एकूण २५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला असल्याचा तपास मोहोळ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने लावला.

सतीश शहाजी खाडेकर रा. वडनेर, ता. परांडा, विशाल संभाजी मेरड व विशाल लक्ष्मण खळवट दोघे रा. उंडेगाव, ता. बार्शी अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे अाहेत. टोळीतील इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

१४ जून रोजी मोहोळ पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेच्या पथकातील हेड. कॉ. सचिन माने, पो. ना. अमोल घोळवे, पो. ना. प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे, महिला पो. ना. अनुसया बंडगर, पो. कॉ. सिद्धेश्वर थोरात हे रात्री गस्त घालताना मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे तिघेजण दुचाकीवरती संशयास्पदरित्या आढळले. तिघे हातात कँड घेऊन डिझेलची चोरी करताना आढळले. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून अत्यंत शिताफीने त्यांना पकडले. त्यांच्या जवळील दुचाकी व डिझेल कँडबाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीनंतर त्यांनी मोहोळ, शेटफळ, सावळेश्वर येथे डिझेल चोरी केल्याचे कबूल केले. दुचाकी बाबत चौकशी केली असता सदर क्लासिक बुलेट ही पुणे येथून चोरी केल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत बार्शी तालुक्यातील उंडेगाव येथून करमाळा व भूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले महिंद्रा अर्जुन कंपनीचे दोन ट्रॅक्टर, माढा व मुरूड जि. लातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन महिंद्रा पिकअप आणि पुणे येथून चोरलेली क्लासिक कंपनीचे बुलेट असा एकूण २५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसानी ताब्यात घेतला. या टोळीने केलेले ६ गुन्हे मोहोळ पोलिसांनी उघडकीस आणले. तपास पोलिस नाईक अमोल घोळवे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...