आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:दिग्विजय शिंदे कमळ सोडून घड्याळ बांधणार; पक्षात घुसमट होत असल्याने पक्षांतराची चर्चा

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांची पक्षात घुसमट होत असल्याने ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश निश्चित होईल, असे समजते.

तालुक्याच्या राजकारणात भाजपने एका दशकापासून चांगला जम बसवला आहे. जिल्हा परिषद, बाजार समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेत सदस्यसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. चंद्रकांत महाजन यांच्यासह सक्रिय व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा महत्वाचा वाटा आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे यांचाही पुढाकार महत्वाचा ठरला आहे.

ज्येष्ठ नेते (कै.) शिवाजीराव चालुक्य, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती ॲड. अभय चालुक्य, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, हर्षवर्धन चालुक्य, माधव पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षसंघटन वाढवण्याचा प्रयत्न केल्याने शहरासह तालुक्यात तरूण कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. भाजपात गेल्या ३०-३५ वर्षापासून सक्रिय असलेले व उमरगा विधानसभा लढवलेले कैलास शिंदे सध्या पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांचे सुपुत्र दिग्विजय शिंदे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी पक्षासाठी केलेले कार्य मोलाचे असले तरी त्याचे फळही मिळाले आहे. कैलास शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली, त्यात ते पराभूत झाले तरी स्वतःची एक वेगळी प्रतिमा आजही आहे. जिल्हा परिषद सदस्यांची संधी मिळाली. जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद मिळाले. सुपुत्र दिग्विजय यांना जिल्हा परिषद सदस्य आणि समाजकल्याण सभापती होण्याचा मान मिळाला. दरम्यान, पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करूनही पक्षांतर्गत कुरघोडीचा प्रयत्न होत असल्याची खंत दिग्विजय शिंदे यांना असल्याची चर्चा आहे. राजकीय पटलावर येण्यासाठी दिग्विजय हातात ‘घड्याळ’ बांधतील, अशी चर्चा आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांना विचारले असता, त्यांनी तो निर्णय मुलाचा असू शकतो, असे सांगून बोलणे टाळले.

बातम्या आणखी आहेत...