आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुळजापूर शहरात घाणीचे साम्राज्य; पालिकेचे दुर्लक्ष

तुळजापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नाली तुंबल्याने रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. असे असतानाही स्वच्छतेच्या नावाखाली कंत्राटदाराला लाखो रुपयांचे बिल काढले जात आहेत. वर्षाला जवळपास कोट्यवधीचा खर्च स्वच्छतेवर केला जात असला तरी शहरात स्वच्छता होत नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहर स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे.

तुळजापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील एसटी कॉलनी, आराधवाडी, मंदिर परिसर, भवानी रोड, खटकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, एसटी स्टँड, घाटशीळ रोड - वाहनतळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंगळवार पेठ आदी शहरातील सर्व भागात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. यामुळे शहरात रोगराई पसरत असून अबाल वृध्दांना साथीच्या आजाराची लागण होत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शाम पवार यांची स्वाक्षरी आहे.

घंटा गाड्या गायब
पूर्वी वेळी अवेळी येणाऱ्या घंटा गाड्या गेल्या काही दिवसांपासून गायब झाल्या आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्याच येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पालिकेवर प्रशासक असून प्रशासकाच्या काळात स्वच्छता ठेकेदारावर कोणाचाही अंकुश राहिला नाही. करारानुसार घंटा गाड्यांनी कचरा गोळा केला नाही तर लोक जमा झालेला कचरा कोठेही बेशिस्तपणे फेकून देतात. यामुळे रोगराई आणि वराहांचा वावर वाढू शकतो. काेरोनाचे सावट अद्याप पूर्ण संपलेले नाही.

महिन्याला १५ लाखाचा स्वच्छतेचा खर्च
शहर स्वच्छतेचा ठेका समृध्दी इनफ्रा स्ट्रक्चर प्रा. ली. पुणे या कंपनीला देण्यात आला असून शहर स्वच्छतेसाठी पालिका महिन्याला १५ लाख रुपये खासगी कंपनीला मोजत आहे. मात्र, लाखो रुपये मोजूनही शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठेक्यातील अटी शर्तीनुसार ठेकेदारावर कारवाई करण्यात पालिका टाळाटाळ करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लोकभावना तीव्रपणे जागृत होण्याअगोदर पालिकेने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...