आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरून जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आहे. काहीजण भाजपसोबत सेनेने नैसर्गिक युती करण्याची भावना व्यक्त करत आहेत. तरी काहीजण महाविकास आघाडीतच सेनेला प्रतिष्ठा असल्याचा दावा करत आहेत.
जिल्ह्यातही महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रभाव जाणवत आहे. जुने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये मोठी मतभिन्नता आढळून येत आहे. काही शिवसैनिक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. काहीजण तर मनात असूनही सर्वजण शेवटी एक होतील म्हणून मत मांडण्यास नकार देत आहेत. यामुळे जुन्या शिवसैनिकांच्या मनात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यातही एकवाक्यता नाही.
एकनाथ शिंदे योग्यच
शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांनी काय केले आहे, हे उभ्या महाष्ट्रातील शिवसैनिकांना माहिती आहे. त्यांनी उचलेले पाऊल अगदी योग्यच आहे. त्यांनी उशिरा हे पाऊल उचलले. एकतर शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेस व शरद पवार यांच्याशी कधीही तडजोड केली नाही. मात्र, उध्दव साहेबांनी त्यांच्याशी सत्तेसाठी अनैसर्गिक आघाडी केली. खऱ्या शिवसैनिकांना हे मान्यच नव्हते. खऱ्या शिवसैनिकांच्या मनात होते तेच शिंदे यांनी केले आहे.
अॅड. रामेश्वर शेटे, माजी तालुकाप्रमुख, उस्मानाबाद.
मातोश्रीला आव्हान, सहन करणार नाही
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, त्यावर शिवसैनिक म्हणून समाधानी वाटते. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत जर कोणी बाळासाहेबांना व उद्धव ठाकरेंना आणि मातोश्रीला आव्हान देत असेल आम्हीच नव्हे उस्मानाबाद जिल्ह्यातील व महाराष्ट्रातला कुठलाही कडवट शिवसैनिक कदापि सहन करणार नाही. कमलाकर चव्हाण, माजी उपजिल्हाप्रमुख
आम्हाला शिवसेनेचे हिंदुत्व कळते
आम्हाला केवळ शिवसेनेचे म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांचे हिंदुत्व कळते. आता तीन पक्षांचे सरकार होते, तेव्हा कामे, निधी हा कमीजास्त होतच असतो. भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात तर शिवसेनेला मंत्र्यांचे राजीनामे खिशात घेऊन फिरावे लागले. शिवसेनेला देवेंद्र फडणवीसांनी जितकी अपमानास्पद वागणूक दिली तितकी कोणीच दिली नाही. उद्धव यांनी भाजपसोबत कधीच जाऊ नये.
पांडुरंग पाटील, माजी शहरप्रमुख, बेंबळी.
आघाडी टाळणे होते गरजेचे
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जायला नको होते. सत्ता नावालाच होती. सत्ता असतानाही सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला नाही. यामुळे एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे. आताही वेळ गेलेली नाही. भाजपसोबत सत्तेचा अर्धा वाटा घेऊन सत्ता स्थापन करावी. सुरुवातीला अडीच – अडीच वर्षाच्या फॉर्मुल्यावर भाजपसोबत सत्ता स्थापन झाली असती तरीही पक्ष आणखी मजबूत झाला असता.
दिलीप रणभोर, माजी उपतालुकाप्रमख, परंडा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.