आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहन करण्याचा इशारा:‘माकणी’तून नदीपात्रात विसर्ग, शेतीचे नुकसान ; पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी

लोहारा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी परिसरातील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

मागील काही दिवसात जोरदार पावसामुळे निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सुरुवातीला चार दरवाज्यातून विसर्ग सुरू होता. परंतु रविवारी रात्री झालेल्या पावसानंतर सोमवारी (दि.५) पहाटे ९ ते १० दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. यामुळे नदीपात्रा शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात राजेगाव, एकोंडी, रेबे चिंचोली, कवठा याठिकाणी सोयाबीन पाण्याखाली आहे. पाणी इतके होते की, नदीपात्राच्या दक्षिण बाजूस ५०० मीटर व उत्तर बाजूस ५०० मीटरपर्यंतच्या शेतात पाणी आले होते, असे राजेगाव येथील शेतकरी अविनाश देशमुख यांनी सांगितले. या ठिकाणी सोयाबीनच्या नुकसानीसह पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील माती वाहून गेली आहे.

नदीपात्रात पाणी सोडल्याने अविनाश देशमुख, अजित देशमुख, नागनाथ माने, अण्णा देशमुख, संजय देशमुख, राहुल देशमुख, समाधान मोरे, गोकुळ मोरे, विद्याधर मोरे, भवन देशमुख, प्रताप मोरे, अमोल देशमुख, अशोक देशमुख, नरेंद्र पाटील, नरेंद्र मोरे, शाहुराज देशमुख, विलास पाटील, बाजीराव पाटील, प्रदीप देशमुख, गोपाळ पाटील, प्रकाश देशमुख, रिंकू पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान, २-३ वर्षांपासून अशीच परिस्थिती असून यापुढे धरणाच्या पाण्याने नुकसान झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा राजेगावचे शेतकरी अविनाश देशमुख यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...