आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलमाल:रोजगार हमीच्या कामांमध्ये अनियमिततेची चर्चा, कामांच्या ताळमेळासाठी धावपळ

काक्रांबाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर पंचायत समितीने तालुक्यात मागील चार-पाच महिन्यांपूर्वी रोजगार हमीतून केलेल्या विविध कामांत अनियमितता झाली असून कामे नियमबाह्य केल्याची व कामे न करतात निधी उचलल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे प्रकरण उघड होण्यापूर्वीच खडबडून जागे झालेल्या पंचायत समितीने अपूर्ण व झालेल्या कामांचा ताळमेळ घालण्यासाठी मागील महिन्यापासून सर्व अधिकारी, कर्मचारी कामाला लावल्याचे समजते. बीडीओंनी तशी तंबी दिली असून आढावा घेण्यासाठी रोजगार सेवकांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे.

तुळजापूर पं. स.मार्फत रोजगार हमी योजनेतून चार-पाच महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात शेतरस्ता, वृक्षलागवड, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामे नियम व अटी न बघता गुत्तेदाराशी संगनमतातून तत्काळ मंजुरी देत कामावर प्रत्यक्षात एकही मजूर उपस्थित नसताना संबंधीत गावचे रोजगार सेवक, सरपंच व ग्रामसेवकांना हाताशी धरली. बीडीओ, तांत्रिक अधिकारी व गुत्तेदारांनी मजुरांची संख्या कागदावर दाखवत शेतरस्ता व वृक्षलागवड, विहिरीची कामे घाईगडबडीत यंत्राद्वारे उरकून लाखोंचा मलिदा लाटल्याचे समजते. पं.स. बीडीओ, तांत्रिक अधिकाऱ्यांनी शासनाचे नियमअटी धाब्यावर बसवत हमीच्या कामातून उखळ पांढरे केल्याचे समजते.

हजेरीपत्रक, मोज पुस्तिकेचा ताळमेळ घालण्यासाठी कसरत
उस्मानाबाद तालुक्यात हमीच्या बोगस कामाचे पितळ उघड पडल्याने तुळजापूर पंचायत समितीचे पितळ उघड पडण्याअगोदर बीडीओंनी मागील महिन्यापासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुक्यात केलेल्या कामांचे हजेरीपत्रक, मस्टर, मोज पुस्तिकांची जुळवाजुळव व ताळमेळ घालण्याचे काम करण्यात येत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या सीईओंनी लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या गावांमध्ये झाली कामे, काही पूर्ण, काही अर्धवट
पंचायत समितीने अणदूर, अपसिंगा, आरळी (बु), आरळी (खु), बिजनवाडी, बोळेगाव, बोरदनवाडी, चिंचोली, देवकुरुळी, देवसिंगा, धोत्री, गंधोरा, गंजेवाडी, गोंधळवाडी, गुजनुर, हंगरगा (नळ), ताड हिपरगा, जळकोट, जवळगा (मे), जळकोटवाडी, कदमवाडी, कसई, कार्ला, काटगाव, काटी, केमवाडी, किलज, कुंभारी, लोहगाव, मंगरूळ, मुर्टा, पिंपळा (बु), पिंपळा (खु), रायखेल, धनेगाव, सलगरा (दि), सांगवी काटी, सरडेवाडी, सारोळा, सावरगांव, शिराढोण, सिंदफळ, तिर्थ (बु), वडगाव देव, वडगाव काटी, वानेवाडी, येवतीसह अनेक कामात रोजगार हमीचे कामे अर्धवट केली केली. काही ठिकाणी काम न करताच कागदोपत्री काम दाखवून निधी हडपल्याची चर्चा तालुक्यात आहे.

वैयक्तिक लाभाच्या मंजुरीसाठी पिळवणूक
शासनाकडून सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना देण्यासाठी जाहिरात करुन प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे रोजगार हमीतून वैयक्तिक लाभाच्या मंजुरीसाठी तुळजापूर पंचायत समितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाभार्थींची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

चौकशी करून कार्यवाही करा
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खु.) येथे काम न करताच निधी उचलल्याची तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी बीडीओंमार्फत झाली आहे. असा प्रकार तालुक्यात इतर ठिकाणी घडला असल्यास त्याची चौकशी करुन संबंधितांवर कार्यवाही करावी.
- शिवाजी साठे, माजी उपसभापती, पंचायत समिती.

बातम्या आणखी आहेत...