आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील काक्रंबा ग्रामपंचायतीची सोमवारी (दि.६) पार पडलेल्या मासिक बैठकीत गावातील शासकीय जागेवर नियमबाह्य रितीने केलेले अतिक्रमण व संपूर्ण दारु बंदीच्या मुद्यावर वादळी चर्चा झाली. मात्र, गावातील वाढलेली अतिक्रमण काढण्यास पुढाकार घेण्यास खुद्द जबाबदार ग्रामपंचायत सदस्यांनी उदासिनता दाखवल्याने यासाठी कोण पुढाकार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.
काक्रंबा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी के. ए. केवळराम यांनी कार्यालयात सरपंच कालिदास खताळ यांच्या अध्यक्षतेखाली गावातील विविध विकासाच्या मुद्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मासिक बैठक बोलावली होती. यावेळी मासिक बैठकीत सुरुवातीलाच काही सदस्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर ग्रामपंचायतीच्या जागेवर गावातील काही लोकांनी बेकायदेशीर व नियमबाह्य रितीने अतिक्रमण केल्याचा मुद्दा उपस्थित केला.
एकेकाळी याच अतिक्रमण केलेल्या ठिकाणी गावातील तरुण वर्गाला खेळण्यासाठी भव्य मैदान होतं. शाळेतील लहान मुलं व गावातील तरुणांचे या ठिकाणी खो खो, कबड्डी, क्रिकेट स्पर्धा तसेच रात्रीच्या वेळी हॉलीबॉल खेळला जात होता. मात्र, याच ग्रामपंचायतच्या नावे असलेल्या शासकीय जागेवर गावातील काही मंडळींनी नियमबाह्य रितीने अतिक्रमण करून बेकायदेशीर रितीने बांधकाम केली. काहींनी पत्र्याचे शेड उभारले.
या अतिक्रमणाला पदाधिकाऱ्यांकडूनच पाठीशी घालण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. वादळी चर्चा होऊनही यावर कोणताही ठाम निर्णय होऊ शकला नाही. यावर कायमस्वरुपी ठोस तोडगा निघावा अशी ग्रामस्थांची इच्छा होती. ३१ जानेवारी रोजी जी ग्रामसभा झाली, त्यातही चर्चा झाली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याची तक्रार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.