आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार योजना:जि. प. शाखा अभियंत्यांना पदस्थापनेचे आदेश मिळेनात ; राज्य सरकारकडे निवेदन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभर रखडलेल्या प्रक्रियेनंतर उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदावर पदोन्नती मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्यांचे पदस्थापनेचे आदेश अद्यापही निर्गमित न झाल्याने राज्यभरातील जिल्हा परिषद अभियंते आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होणार आहे. त्यानुषंगाने अभियंता संघटनेच्यावतीने राज्य सरकारकडे विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील शाखा अभियंत्यांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया नोव्हेंबर २०२१ पासून चालू झाली आहे. प्रक्रियेदरम्यान जून २०२२ मध्ये पार पडलेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत जवळपास १६० पात्र शाखा अभियंत्यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदावर निवड करण्यात आली. निवड झालेल्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबत शिफारस करण्यात आली असूनही मागील दोन महिन्यांपासून पदस्थापनेचे आदेश निर्गमित झाले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्यांना ३०-३५ वर्षे एकाच पदावर सेवा करुनही पदोन्नती मिळत नाही. त्यातही ज्या १६० अभियंत्यांना पदोन्नतीची संधी मिळाली आहे,त्यांना केवळ प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे व दफ्तर दिरंगाईमुळे पदस्थापना मिळाली नाही. जे अभियंते सेवानिवृत्त होणार आहेत, केवळ त्यांचेच पदस्थापनेचे आदेश, तेही सेवानिवृत्तीच्या दिवशीच शासनाकडून निर्गमित करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष सुहास धारासूरकर, महासचिव गणेश शिंगणे,कार्याध्यक्ष सतीश मारबदे यांची स्वाक्षरी आहे.

बातम्या आणखी आहेत...