आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भूम तालुक्यात अडचणीतील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत ; रब्बी हातात पडेताेपर्यंत चिंता

भूम10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा अतिवृष्टीमुळे शेतीला फटका बसला असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मातीमोल झाला आहे. मात्र, पिकांचे पंचनामे होऊनही अद्यापही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळाली नाही. अडचणीत सापडलेला शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे. अनुदानास दिरंगाई झाल्यास विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भूम तालुक्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली होती. मात्र, प्रत्येक वेळी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाही. यंदाही शेतकऱ्यांना अद्याप अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. तालुक्यातील विविध पक्षाची राजकीय मंडळी नुकसान भरपाईच्या अनुदानाबाबत मुग गिळून गप्प आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत घोषणा होऊन महिने उलटून गेले तरी अद्यापही शेतकरी प्रतिक्षेत आहे. शेतीचे उत्पन्न पदरात न पडल्याने अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रब्बीचे पीक पदरात पडेपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. असे असतानाही पीक विमा कंपनीकडून मदतीची रक्कम वितरीत केली जात नाही. तालुक्यातील जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषा बाहेरील पावसात झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना ३ हजार ३३५ हेक्टरवरील बाधित क्षेत्रातील पिकांच्या नुकसानी पोटी शासनाकडून ४ कोटी २६ लाख ५० हजार रुपये अनुदान तहसील कार्यालयाकडे प्राप्त होताच १० हजार ८८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

परंतु, सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी होऊन तालुक्यातील माणकेश्वर, भूम व आंबी या तीन मंडळातील २८ हजार ३५ हेक्टरवरील पिकांच्या बाधित क्षेत्राचे ६८ कोटी १२ लाख ७६ हजार रुपये ही रक्कम तालुक्यातील २८ हजार ७२ शेतकऱ्यांना मिळणार होती. परतु, ही रक्कम अद्यापही शासनाकडून प्राप्त झाली नाही. तसेच सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये ईट व वालवड मंडळात १८ हजार ८२८ बाधित क्षेत्रावरील २१ हजार ५७२ शेतकऱ्यांना २५ कोटी ६० लाख ६० हजार ८०० रुपये निधी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यातील सोयाबीन, उडीद, मूग व तूर या पिकांचे नुकसान झालेले आहे. या पिकांच्या नुकसान भरपाईच्या निधीसाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आपल्या पिकांची संरक्षित रक्कम भरली आहे. शासनाने अतिवृष्टीची तर विमा कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.भूम येथील शेतकरी धनंजय शेटे यांनीही तत्काळ नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

सर्वांना मदत मिळणार राज्यात महायुतीचे सरकार असल्याने शेतकऱ्यांना सर्व मदत मिळणार आहे. यापूर्वीही महायुतीच्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भरपाई देण्यात आली आहे. त्याप्रमाणे याही वेळी मदत दिली जाणार आहे. बालाजी गुंजाळ, शिवसेना (शिंदे गट ) तालुका प्रमुख, भूम.

बातम्या आणखी आहेत...