आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने आरोग्य पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्याचे वाण मोफत देण्यात येत आहे. यातून पोषणमूल्यांची गरज भागण्यास मदत होईल, असे मत तालुका कृषी अधिकारी सागर बारवकर यांनी व्यक्त केले.
आत्मा अंतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजनेच्या माध्यमातून कोराळ, सुपतगाव, हिप्परगाराव, माडज, जवळगा बेट, भूसणी, नाईचाकूर व एकुरगा आदी गावांत भाजीपाला मिनी किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, वाल, मेथी, गाजर, गवार, मिरची, कोथिंबिरीसह आदी भाजीपाला बियाणे आहेत.
तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मोईन सय्यद, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रतिज्योत गर्जे-पाटील यांनी भाजीपाला बियाणाचे महत्त्व सांगून शेतकरी कुटुंबाला पोषणयुक्त व सुरक्षित अन्नपुरवठा, विषमुक्त भाजीपाला उपलब्ध करणे, कुपोषण कमी करणे, ग्रामीण शेतकऱ्यांना आजारांपासून मुक्त करणे आदीसाठी ही योजना राबवली जात आहे, असे सांगितले.
गर्जे-पाटील यांनी बियाणांच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जागा निवडावी. जागा राहत्या घराजवळ असावी, लागवड करताना मशागत करून माती भुसभुशीत करत शेणखत टाकावे. पालेभाज्यांसाठी गादी वाफे करावे. फळभाज्यांसाठी सरीवरंबे, हंगामानुसार येणाऱ्या पिकांची लागवड करावी. भाजीपाल्याचे आहारातील महत्त्व, लागवड, जोपासना, कीड व रोग, बियाणे बँकेसाठी ग्रामस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे पोषणमान उंचावणार असून शेतकरी कुटुंब रोगमुक्त जीवन जगू शकणार, असे सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रगत शेतकरी महेशंकर पाटील, बालाजी सुरवसे, संभाजी बिराजदार, दिलीप भोसले, अजित माने, हिराचंद पंडित यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.