आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट 6:​​​​​​​सुरक्षाच रुग्णशय्येवर, वर्षभरापासून उपचार, 5 काेटींची तरतूद; अग्निराेधक यंत्रणेसाठी आता आली जाग

उस्मानाबाद (उपेंद्र काटके )8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षाच रुग्णशय्येवर : उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, रुग्णालयासाेबतच अग्निशमन तैनात

नाशिक, विरार आणि आता मुंब्रा... कोविड रुग्णालयातील दुर्घटनांची मालिका सुरूच असताना मंत्रीस्तरावरून तातडीच्या सूचना मिळाल्यानंतरही राज्यातील जिल्हा रुग्णालयांमधील कोविड रुग्णांची सुरक्षा रामभरोसेच आहे. तब्बल पाच कोटींची तरतूद असूनही बंद लिफ्ट आणि जिन्यांना ठोकलेले पत्रे अशा परिस्थितीत येथील चारशे रुग्णांची सुरक्षा व्यवस्था एकाच बंबावर असल्याचे धक्कादायक चित्र येथे दिसले. राज्यभरातील दुर्घटनांच्या सत्रानंतर येथील यंत्रणा जागी झाली असून जिल्हा रुग्णालयाने अग्निशमन यंत्रणा उभारण्यास आत्ता सुरुवात केली आहे.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाची इमारत तशी नवीन. मात्र, १४ कोटींच्या निधीअभावी अर्धवट बांधलेल्या या इमारतीतच गेल्या तीन वर्षांपासून बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. दरम्यान, कोविडची आपत्ती उद्भवल्यावर या अर्धवट इमारतीतच कोविड रुग्णालय सुरू झाले. येथे कोविड रुग्णांवर उपचार सुरू करून वर्ष उलटले, पण अग्निरोधक यंत्रणा उभारण्यासाठी इतरत्र दुर्घटना घडाव्या लागल्या. स्वतंत्र प्रवेश व प्रतीक्षागृहाची व्यवस्था करणे रुग्णालयाच्या व रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे दिसले. या ठिकाणी रुग्णांसाेबत नातलगांची गर्दी जाेखीम ठरत अाहे.

लिफ्ट बंद, गेटवर पत्रे
अर्धवट बांधकामामुळे येथील जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुरूच करण्यात आलेली नाही. सुरुवातीला टप्प्याटप्प्याने सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत तरी कोणतीही यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही. यामध्ये लिफ्टचाही समावेश आहे. लिफ्टच्या गेटवर पत्रे ठोकण्यात आले आहेत. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वाहनांचा मार्ग व पायऱ्यांचाच पर्याय उपलब्ध आहे.

ऑक्सिजन प्लँटही सुरक्षेच्या प्रतीक्षेत
येथे दोन दिवसांपासून ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित करण्यात आला आहे. याचा रुग्णांना आधार असला तरी आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नाशिकच्या घटनेनंतर ऑक्सिजन प्लँट ही संवेनशील यंत्रणा असल्याचे पुढे आल्याने त्याच्या संरक्षणासाठी येथे स्वतंत्र व सतर्क यंत्रणा आवश्यक आहे.

आधी उपचार, मग ऑडिट
फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून कोणती यंत्रणा आवश्यक आहे याची चाचपणी करण्यात आली. यापैकी केवळ जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा बसवण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. येथे आता अग्निशमन साहित्य बसविण्यात येत आहे. आताच काम सुरू झाल्याने ती कार्यान्वित होण्यास विलंब लागणार आहे. दरम्यान, अन्य ठिकाणच्या दुर्घटनांवरून सावध होत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून येथे एक अग्निशमन बंब उभा करण्यात आला आहे. त्यासाठी तीन पाळ्यांमध्ये बारा कर्मचारी तैनात आहेत हाच दिलासा.

निविदा प्रक्रिया सुरू आहे
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट फेब्रुवारीला करण्यात आले आहे. यंत्रणा उभी करण्यासाठी पाच कोटींची तरतूद केली आहे. यापैकी जिल्हा रुग्णालयातील काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्ण व रुग्णालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. - कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

बातम्या आणखी आहेत...