आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुळजापुरात दानपेटी लिलाव बंदमुळे मंदिराची श्रीमंती 13 वर्षांत 10 पटीने वाढली; रक्कम 40 कोटींवरून 240 कोटी

धाराशिव / चंद्रसेन देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेवरील वाढती श्रद्धा आणि भाविकांची वाढती संख्या यामुळे मंदिरातील दानपेट्यांत भाविकांनी दिलेले दानही वाढत चालले असून दानपेट्यांच्या लिलावाची पद्धत बंद झाल्यापासून गेल्या १३ वर्षांत मंदिराचे रोख व सोन्या-चांदीच्या स्वरूपातील उत्पन्न तब्बल १० पट वाढले आहे. २०१० मध्ये मंदिराकडे भाविकांनी वाहिलेले २१ किलो सोने होते. १३ वर्षांत यात सुमारे १८७ किलोची भर पडली असून मंदिराकडे आता २०८ किलो वाहिक सोने आणि ३ हजार ४०४ किलो चांदी आहे. रोख रकमेचे दानही वाढले असून देणग्या आणि एकूण उत्पन्नामुळे मंदिराकडे ४० कोटींवरून २४० कोटी ९७ लाख,६० हजार रुपये जमा झाले आहेत. याशिवाय पुरातन काळापासून राजा-महाराजांनी मातेला वाहिलेले अमूल्य असे ७ पेट्या भरून दागिने मंदिराकडे आहेत.

मंदिराच्या खजिन्यात हिरे,माणिक, मोती असलेल्या अलंकारांचा समावेश आहे. मात्र १३ वर्षापूर्वीपर्यंत दागिन्यांच्या नोंदी व दानपेट्यांच्या लिलावात गैरप्रकार होत राहिले आणि याची गंभीर दखल घेत मंदिर प्रशासन आणि धर्मादाय आयुक्तांनी दानपेटीचा लिलाव बंद करून थेट मंदिरामार्फत नियंत्रण सुरू केले.

मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. १० वर्षांत भाविकांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून सुट्या, यात्रा, उत्सवाचा कालावधी वगळून म्हणजे सोमवार ते गुरुवार दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सरासरी संख्या १५ हजारावर आहे. पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, रविवार तसेच सुट्यांच्या कालावधीत हे प्रमाण २५ ते ३० हजारांवर आहे. उत्सव काळात भाविकांची संख्या लाखावर जाते. या काळात देणगी तसेच गुप्तदानही मोठ्या प्रमाणावर केले जाते.

भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ताळमेळ लागत नसल्याने पुजारी मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष किशोर गंगणे यांनी मंदिराकडे तसेच धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी दानपेटीला सील करून दागिन्यांचा तसेच अर्पण केलेल्या रकमेचा अंदाज घेतला. लिलावातून येणारी आणि दानपेटीत पडणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर येताच तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दानपेटीचा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१०-११ मध्ये याच सिंहासन दानपेट्यांमध्ये ३ कोटी ५८ लाख ४६ हजार रुपये जमा झाले. २०११-१२ मध्ये ५ कोटी ३ लाख, ४० हजार रूपये तर २०२२-२३ अखेर या दानपेटीमध्ये सुमारे ११ कोटी ९६ हजार ९९० रूपये दान जमा झाले.अन्य दानपेट्यांमध्ये २०२२-२३ मध्ये ७ कोटी ७६ लाख ८ हजारांची रक्कम जमा झाली आहे.

मंदिराचे अधिकृत सेवेकरी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली दानपेट्या उघडल्या जातात. देणगी तसेच दान केलेली रक्कम दरवर्षी वाढतच असून,मंदिर परिसरातील उपदेवता, सशुल्क दर्शन, दुकानांचे भाडे,यातून मंदिराच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे.

शिस्त व सुलभ दर्शनामुळे समाधान
मंदिरात शिस्त आणि दर्शनातील सुलभपणा, यामुळे भाविक समाधानी आहेत. भाविक वाढले तसे दानही वाढत आहे. आता भाविकांनी देवीला दागिने वाहिल्यानंतर त्यांच्यासमोरच वजन करून पावती दिली जाते. भाविकांना समाधान मिळण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा मंदिर संस्थानचा प्रयत्न आहे. - डाॅ. सचिन आंेबासे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

पेट्यांमध्ये वाहिलेल्या दागिन्यांचा ताळमेळ नव्हता, म्हणून लिलाव बंद
२०१० पूर्वी सिंहासह दानपेट्यांचा लिलाव करण्याची पध्दत होती. या दानपेटीत भाविकांनी वाहिलेली रक्कम ठेकेदाराला मिळत होती. वर्षाला हा लिलाव होत होता.२००९-१० मध्ये शेवटचा लिलाव २ कोटी ३० लाख रुपयांना झाला होता.

अनमोल दागिन्यांचा खजिना
तुळजाभवानी मंदिराचा कालखंड निश्चितपणे सांगता येत नसला तरी अभ्यासकांच्या मते मंदिराचे बांधकाम सुमारे ७०० वर्षांपेक्षा अधिक जुने असावे. अनेक राजे-सरदारांनी देवीला दागिने, हिरे, माणिक, मोती, जमिनी व सािहत्याच्या माध्यमातून दान दिले. आजही या जुन्या अलंकारांसह देवीची महापूजा मांडली जाते.७ पैकी निवडक पेट्यांतील दागिन्यांनी देवीची विशेष सण, उत्सवाला महापूजा मांडली जाते.

वाढलेले उत्पन्न (दागिने वगळून) वर्ष रक्कम २०१० ४० कोटी ३४ लाख ९८ हजार २०१२ ४३ कोटी, ४८लाख,९६ हजार २०१३ ६७ कोटी, १५ लाख,५ हजार २०१५ ७२ कोटी,५१ लाख,६५ हजार २०१६ ८६ कोटी,४ लाख,३१ हजार २०१८ १५६ कोटी ४८ लाख ४९ हजार २०२० १९० कोटी ७८ लाख १७ हजार २०२१ २२८ कोटी २२ लाख ६५ हजार २०२३ २४० काेटी ९७ लाख ६० हजार