आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर दौरा:रोचकरी यांना संयम ठेवण्याचा डॉ. सावंत यांचा सल्ला

तुळजापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोचकरी यांना श्रध्दा, सबूरी व संयम ठेवण्याचा सल्ला राज्याचे आरोग्य मंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्याचा विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन सावंत यांनी यावेळी केले. दरम्यान डाॅ. सावंत यांचा सत्कार सोहळ्याचा निमित्ताने रोचकरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

मंगळवार (दि. ६) रात्री उशिरा रोचकरी यांचा निवासस्थानी आयोजित सत्कार सोहळ्यात डाॅ. सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके, भुम चे संजय गाढवे, मोहन पनुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अपेक्षा करणे, ध्यास घेणे वाईट नाही पण त्या साठी थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे आणि राजकारणात तर थोडा जास्तच संयम आवश्यक असल्याचे सावंत यांनी सांगितले. २००४ सालच्या जळकोट घटनेचा उल्लेख करत रोचकरी यांनी त्यावेळी थोडा संयम ठेवला असता तर रोचकरी आज आमदार असले असते असे सांगितले.

यावेळी कृष्णा रोचकरी, गणेश रोचकरी, अॅड. उदय भोसले, शिवाजी कांबळे, दिलीप लोमटे, लिंगय्या स्वामी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तत्पूर्वी डाॅ. सावंत यांनी मंदिर बंद झाले असल्याने महाद्वारातूनच तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी महाद्वारातच पुजा, आरती करण्यात आली. तसेच रणसम्राट कबड्डी संघाचा गणपती ची आरती डाॅ. सावंत यांचा हस्ते करण्यात आली. सावंत कार्यक्रम स्थळी रात्री ८ वाजता येणार होते. मात्र त्यांचे आगमन रात्री ११:३० ला झाले. कार्यक्रमाला उशीर होऊनही मोठ्या संख्येने रोचकरी समर्थक उपस्थित होते. सावंत यांचा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या संख्येने डिजीटल लावत रोचकरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...