आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔषध निरीक्षकांअभावी येथील अन्न व औषध प्रशासनातील कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प झाले होते. आता निरीक्षक मिळाल्यापासून पुन्हा प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आले असून नियमित मेडिकल दुकानांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. गर्भपाताच्या गोळ्या विकणे, चिठ्ठीशिवाय औषधे देणे आदी बेकायदा कृत्य करणाऱ्या २० दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ३ दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. औषध निरीक्षक नसल्यामुळे अन्न व औषध प्रशासनातील औषध विभागाला घरघर लागली होती.
कोणत्याही कारवाया होत नसल्यामुळे हा विभागच आहे की नाही, असे वाटत हाेते. पूर्वीचे औषध निरीक्षक विलास दुसाने यांची बदली झाल्यावर सुमारे वर्षभर येथील पद रिक्त होते. आता काही महिन्यांपासून औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी धडाकेबाज कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून २०० पेक्षा अधिक दुकानांना अचानक भेटी देऊन तपासण्या केल्या आहेत. यामध्ये नियमबाह्यपणा आढळलेल्या ३२ दुकानांना नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये २० दुकानांचे परवाने ८ ते २० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.
यामध्ये ज्या दुकानदाराने तोडलेल्या नियमाची तीव्रता किती आहे, त्यानुसार त्यांचे अधिकदिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. तसेच काही दुकानांचे कृत्य तर माफ न करण्याप्रमाणेच होते. त्यानुसार तीन दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. निलंबन व रद्द केलेल्या दुकानदारांना आयुक्तांकडे अपिल करण्याची संधी आहे. मात्र, या दरम्यान दुकान उघडे आढळल्यास यापेक्षा तीव्रता अधिक असलेली कारवाई होऊ शकते. या दुकानांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे, असे पाटील यांनी सांगितले.
या कारणांमुळे केली कारवाई
ग्राहकांना पावती देणे आवश्यक असताना योग्य पावती न देताच औषधांची विक्री करणे. एमबीबीएस किंवा तत्सम पदवी प्राप्त डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठी शिवाय औषधांची विक्री. गर्भपाताच्या गोळ्या, झोपेची औषधांच्या कोणत्याही नोंदी न ठेवताच खरेदी व विक्री करणे. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय . दुकानात अस्वच्छता ठेवणे, शासनाने सांगितलेल्या नियमानुसार दुकानांची ठेवण नसणे . वारंवार नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई झाली.
एमबीबीएस डॉक्टरांची अडचण
सध्या विविध रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांची एच, एच – १ शेड्यूलमध्ये वर्गिकरण करण्यात आले आहे. अशा काही औषधांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याची व तपासणीची गरज असते. अशी तपासणी एमबीबीएस डॉक्टर करू शकतात. मात्र, ग्रामीण भागात या डॉक्टरांची वानवा आहे. यामुळे मेडिकल दुकानदारांनाही या नियमांचे पालन करणे शक्य होत नाही. नियमित औषधे घेणारा रुग्ण दुकानात येऊन औषधांचा हट्ट करतो तेव्हा दुकानदार चिठ्ठीचा आग्रह करतात. यावेळी मोठे वाद होतात.
मनुष्यबळाची कमतरता
सध्या प्रशासनाकडे पुरेशा मनुष्यबळाची कमतरता आहे, हे बरोबर असले तरी ग्राहकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासन सातत्याने घेत आहे. मेडिकलच्या बाबतीत कोणतीही तक्रार आली तर तातडीने त्याचा निपटारा करण्यात येत असतो. -श्रीकांत पाटील, औषध निरीक्षक, एफडीए.
अनेक दिवस प्रभारीराज
अनेक दिवस येथे केवळ प्रभारीराज होते. येथील औषध निरीक्षकांचा पदभार अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे दिला होता. मात्र, तेथीलच काम संपत नसल्यामुळे त्या निरीक्षकांना उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन काम करणे शक्य होत नव्हते. वास्तविक पहाता येथे दोन निरीक्षकांची गरज असताना गेल्या १२ वर्षांपासून एकावरच भागवण्याचा प्रकार सुरू आहे. तरीही ते एकही पद भरलेले ठेवण्याची तसदी शासन घेत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.