आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्ह्याची परिसीमा:मद्यधुंद युवकांचा हॉटेलचालकावर गोळीबार; 6 जणांचा धुडगूस, 1 गंभीर

काक्रंबाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उस्मानाबाद तालुक्यातील घटना, एका आरोपीला पकडले

नागपूर-रत्नागिरी राज्य महामार्गावर उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी गावालगत असलेल्या हॉटेलमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना प्रतिबंध करताच हाॅटेलचालकावर सहा लोकांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि. ३) दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये हाॅटेलचालक गंभीर जखमी झाला. गोळीबार करणाऱ्या सहापैकी पाच जणांनी गाडीसह पोबारा केला. एकाला हॉटेलमधील कामगारांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. दरम्यान, हॉटेलमालकाला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी गावालगत नागपूर-रत्नागिरी या राज्य महामार्गावर तुळजापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर बाळासाहेब दामोदर मोरे यांचे रिलॅक्स नावाचे हाॅटेल असून याच हॉटेलवर पुणे पासिंगच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या सहा अज्ञात लोकांनी जेवणासाठी ऑर्डर दिली. त्यानंतर त्यांनी दारू पिऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हाॅटेल मालक बाळासाहेब मोरे यांनी त्यांना ‘गोंधळ करू नका, माझ्याकडे फॅमिली गिऱ्हाईक आहेत, शांत बसा,’ अशी विनंती केली. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अज्ञात सहा लोकांनी त्यांच्याशी वाद घातला. तसेच मारहाण केली. एकाने पिस्तुलातून मोरे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये मोरे यांना दोन गोळ्या लागल्या. एक उजव्या दंडावर व छातीवर गोळी लागल्याने मोरे जखमी झाले. त्यांना सोलापूर व त्यानंतर पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हाॅटेल परिसरात गोंधळ उडताच हॉटेलमधील कामगार व भंडारी गावातील नागरिकांनी हाॅटेलकडे धाव घेतली. सहापैकी पाच जणांनी जीपसह पोबारा केला, तर अन्य एकास कामगारांनी पकडून चोप दिला. सदरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी बेंबळी पोलिसांना देताच घटनास्थळाला सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे आदींनी तत्काळ पोलिस फौजफाट्यासह धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

पोलिसांची दोन पथके केली रवाना, एका आरोपीचा लागला सुगावा
उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. दिलीप टिपरशे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, भंडारी शिवारात हॉटेलमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या लोकांना रोखणाऱ्या मालकावर गोळीबार करून फरार झालेल्या पाच अज्ञात लोकांच्या शोधासाठी त्यांच्या मागावर पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. एकाचा सुगावा लागल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. सदरील प्रकार वेटरसोबत झालेल्या वादातून झाल्याचे समोर येत आहे. आरोपी शेजारच्या जिल्ह्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...