आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठ दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊसही झाला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने मागील आठवड्यात ३८ अंशांवर गेलेले कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत खाली घसरले आहे. कधी उकाडा तर कधी हिवाळ्यासारखी थंडी जाणवत आहे. यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध सर्दी, खोकल्यासह विषाणुजन्य आजारांना बळी पडत आहेत. अनेकांना उलटी, मळमळ होऊन डोके गरगरत आहेत. यावर्षी फेब्रुवारीत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता जाणवली होती. २७ फेब्रुवारीला किमान पारा २३ तर कमाल पारा ३८ अंशांवर गेला होता. त्यामुळे उन्हाळ्याचे तीन महिने कडक जाणार, असे वाटत होते. मात्र, मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला.
ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस झाल्याने हवेत थंडावा निर्माण झाला आहे. परिणामी, उन्हाची तीव्रता कमी झाली असून किमान तापमान १८ ते २१ तर कमाल तापमान ३१ अंशांवर स्थिरावले आहे. तब्बल ७ अंशांनी पारा घसरल्याने वातावरणात थंडी वाढली असून हवेचा वेग अधिक आहे. यामुळे थंड पेयांच्या दुकानातील गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. रात्री गारवा जाणवत असून दिवसभर ढगाळ वातावरणाने दमटपणा वाढला आहे. होळी, धुलिवंदपासून वातावरणात थंडावा जाणवत आहे. रात्री थंडी व दिवसा उकाड्यामुळे मोठ्यांसह लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास वाढला आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी सोडून हरभरा व इतर पिकांची काढणी झाली आहे. त्यामुळे पिकांना ढगाळ वातावरणाचा फटका बसणार नाही. मात्र, हलका पाऊस झाल्यास काढणीला आलेल्या ज्वारीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हलक्या पावसाची शक्यता
धूलिवंदनपासून वातावरणात बदल झाला असून अधूनमधुन ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. फेब्रुवारीत जाणवणारी उन्हाची तीव्रता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कमी झाल्याने किमान व कमाल तापमान घटले आहे. आगामी काही दिवसांत ढगाळ वातावरण राहणार असून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. -ए. के. भड, तापमान निरीक्षक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.