आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:पावसाअभावी काक्रंबा परिसरात करपू लागली कोवळी पिके; अत्यल्प पावसावर पेरणी केलेल्यांसमोर दुबार पेरणीचे संकट

काक्रंबा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावासह परिसरात वरुणराजाने डोळे मिटल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दुसरीकडे आठ दिवसांअगोदर झालेल्या अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने ओढ दिल्याने कोवळी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पिकांना उपलब्ध पाणी देऊन पिके जगवण्याची धडपड करत आहेत.

काक्रंबासह परिसरातील काक्रंबावाडी, बारुळ, होनाळा, वडगाव लाख, खंडाळा, मोर्डा, तडवळा कार्ला, वानेगाव, जवळगा मे, सलगरा दि, किलज, वडगाव देव, हंगरगा तुळ, अपसिंगा, तीर्थ बु, तीर्थ खु. काटगाव, सिंदफळ, नांदुरी, चव्हाणवाडी, मंगरुळ, कोरेवाडी, बोरी, कुंभारी आदी गावातील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या जेमतेम पावसावर पेरणी केली. सध्या उडीद, मूग, सोयाबीन, तूर, हायब्रीड आदींसह अनेक कोवळी पिके माना वर काढत आहेत. अशावेळी ५ ते ६ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे.

त्यामुळे पावसाअभावी पिकांची वाढ खुंटते आहे. दिवसभर तीव्र उन्हामुळे पिके माना टाकू लागली आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी ठिबक, स्प्रिंपकर सिंचनाच्या माध्यमातनू पिकांना पाणी देऊन पिके जगवण्यासाठी धडपड करत आहेत. दुसरीकडे पाणी नसणाऱ्या शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. दरम्यान, यासंदर्भात कृषी सहायकांशी संपर्क साधला असता, तालुक्यात खरीप पेरणीसाठी अद्याप आवश्यक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी घाई करू नये. कमीत-कमी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे कृषी सहायक ए. ए. पाटील यांनी सांगितले.

परंडा तालुक्यात केवळ ८ टक्के पाऊस परंडा तालुक्यासह परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पेरणी लांबली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६१५ मिमी आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणी लांबल्याने शेती उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तालुक्यात खरिपाचे सरासरी ३३ हजार ६८० हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे. खरीप हंगामातील उडीद, तूर, सोयाबीन, कांदा पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. खरीप पेरणीच्या सरासरी क्षेत्रात बाजरी ३९० हेक्टर, मूग १ हजार ८५० हेक्टर, भुईमूग ६१० हेक्टर तीळ २२ हेक्टर, सूर्यफुल १४५ हेक्टर, उडीद २१ हजार ५०० हेक्टर, तूर १३ हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १५७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. यावर्षी खरिपाची ४३ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. दरम्यान तालुक्यात मागील वर्षी सर्व प्रकल्प भरले होते. १७ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती.

कमीत कमी ७० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करावी
तालुक्यात सध्या केवळ ९.४ मिमी म्हणजे केवळ ८ टक्के पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी ७० ते १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. पेरणीवेळी बीजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचा वापर करावा. बियाणे खरेदीची पावती जपून ठेवावी, बियाण्याची पिशवी उलट्या दिशेने फोडावी, जेणेकरून त्यावरील पावती सुरक्षित राहील. यामुळे बियाणे उगवले नाही तर संबंधीत कंपनीकडे दाद मागण्यासाठी मदत होईल.
- ए. यू. रूपनवर, तालुका कृषी अधिकारी. परंडा.

बातम्या आणखी आहेत...