आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सव:नियोजनामुळे तुळजाभवानी मातेचे भाविकांना एका तासामध्ये दर्शन, सशुल्क दर्शनाला प्रतिसाद नाही

तुळजापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मातेच्या रथात स्वार रूपाचे शनिवारी (दि. ९) दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर संस्थानच्या उपाययोजनांमुळे शनिवारी भाविकांना धर्मदर्शन केवळ एक तासात मिळत होते, तर सशुल्क दर्शनाचे दर वाढवून ३०० रुपये केल्याने भाविकांनी सशुल्क दर्शनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दरम्यान, जोरदार पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली.

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या / चौथ्या माळेला शनिवारी (दि.९) तुळजाभवानी मातेची रथालंकार पूजा मांडण्यात आली. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालून धुपारतीनंतर अंगारा काढण्यात आला. या वेळी महंत, पुजारी, सेवेकरी आणि मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत तुळजाभवानी मातेची रथालंकार पूजा भाविकांसाठी खुली होती. तत्पूर्वी पहाटे चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर उघडण्यात आले, तर सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा छबिना मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, मंदिर संस्थानच्या नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ मिळाला. धर्मदर्शनाला केवळ एका तासाचा वेळ लागत होता, तर सशुल्क दर्शन ३०० रुपये केल्याने सशुल्क दर्शनास भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

पावसामुळे तारांबळ
शुक्रवार (दि. ८) रात्री तसेच शनिवारी (दि. ९) सकाळी तीर्थक्षेत्र तुळजापूरला जोरदार पावसाने झोडपले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसाने भाविकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी चिखल झाला होता. चिखलामुळे भाविकांची वाहने फसण्याचे प्रकार घडले. त्यामुळे भाविकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.

कोल्हापूर, माहूरमध्येही गर्दी
शनिवारी आणि रविवारची सुटी आल्याने अनेक भाविकांनी ऑनलाईन पास घेऊन दर्शन घेणे पसंत केल्याचे चित्र होते. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल झाले होते. ऑनलाइन पास घेतल्याने अनेकांची यामुळे सोय झाली. माहूर गडावरही शनिवारी भाविकांची बऱ्यापैकी गर्दी दिसून आली. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक आता टप्याटप्याने दाखल होत असल्याचे चित्र आहे, तर वणीच्या सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनालाही भाविक येत असल्याचे सांगणत आले आहे.

प्रक्षाळ पूजेला सर्व स्थानिकांना सोडणार
प्रक्षाळ पूजेसाठी सर्व शहरवासीयांना आधार कार्ड पाहून राजमाता जिजाऊ महाद्वारातून मंदिरात सोडण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. आधार कार्ड आणि कलश पाहून मंदिरात सोडण्यात येणार आहे. यामुळे नवरात्रात ९ दिवस प्रक्षाळ पूजेदरम्यान स्थानिकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...