आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिकविमा मिळेना, अतिवृष्टीचे अनुदानही रखडले यामुळे सोनेगाव (ता. धाराशिव) येथे जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह सात शेतकऱ्यांनी जमिनीत गाडून घेण्याचे आंदोलन केले. प्रचंड उन्हामुळे दोन शेतकऱ्यांना भोवळ आली. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तीच तीच उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सध्या विधीमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे प्रकरण न वाढण्याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर महसुल व पोलिस यंत्रणेनेने सुटकेचा श्वास सोडला.
दिवाळीच्या दरम्यान १६०० कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याची वल्गना करणाऱ्या राज्य शासनाने अद्याप अतिवृष्टी २२२ कोटी अनुदान वितरीत केलेले नाही. तसेच पिकविमा कंपनीवरीलही सरकारचे नियंत्रण सुटल्यासारखी स्थिती असून अनेकांना अद्याप हक्काचा विमाही मिळालेला नाही. यामुळे जनहित शेतकरी संघटनेने तातडीने शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास जमिनीत गाडून घेण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास
विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे. आंदोलनाचे पडसाद विधीमंडळापर्यंत जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करण्यात येत होते. क्षणक्षणाला माहिती वरिष्ठस्तरावर दिली जात होती. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी काही प्रतिष्ठीतांना मध्यस्थी बनवून शेतकऱ्यांचे मन वळण्याची खेळी केली. यात यश आल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
शिंदेंच्या काळात ८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, विमा व अनुदान रखडले, हातचे पिक वाया गेले, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नसल्याने शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जिल्ह्यातील ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अद्यापही आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तरीही शासनाकडून शेतकऱ्यांना रक्कम देण्यासाठी विलंब केला जात आहे. विमा कंपन्यांवरही म्हणावा तसा दबाव टाकला जात नाही.
अधिकाऱ्यांकडून तीच तीच उत्तरे
वास्तविक पहाता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून कंपनीच्या हेकेखोरपणामुळे विमा मिळालेला नाही. तसेच यावर्षी प्रचंड अतिवृष्टी होऊन अनुदानही देण्यात आलेले नाही. दिवाळीपासून शेतकरी अनुदानाची प्रतीक्षा करत आहे. यावेळीही नेहमीची टीपिकल उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सरकार प्रयत्नशिल आहे, प्रशासन पाठपुरावा करत आहे, पत्रव्यवहार सुरू आहे, अशीच उत्तरे शेतकऱ्यांना मिळाली.
मागणी पूर्ण न केल्यास तीव्र अांदोलन
सध्या आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. आणखी १० दिवस प्रतीक्षा करण्यात येईल. हक्काची रक्कम न मिळाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. त्यावेळी मात्र, माघार घेतली जाणार नाही.- अमोल जाधव, जिल्हाध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना.
रक्कम मिळाल्यावर लगेच वितरीत
शासनाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अनुदानाची रक्कम तालुकास्तरावर प्राप्त होताच ती लगेच वितरीत करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. विमा कंपनीलाही याेग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.- गणेश माळी, तहसीलदार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.