आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी शाळेची दुरावस्था:धोकादायक इमारतीमुळे 133 विद्यार्थी बसले घरीच

उस्मानाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९५४ मध्ये बांधलेल्या वाशी तालुक्यातील घोडकी जिल्हा परिषद शाळेची गेल्या ६८ वर्षात एकदाही दुरूस्ती झाली नाही, परिणामी इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे मंगळवारपासून (दि.२२) गावातील सर्वच १३३ विद्यार्थ्यांनी शाळेला न जाण्याचा निर्णय घेतला.

पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील घोडकी जिल्हा परिषद शाळा आता बेमुदत बंद राहणार का, याकडे लक्ष लागले. या शाळेची इमारत ६८ वर्षांपूर्वी उभारली. तेव्हापासून प्रशासनाने दुरुस्ती केली नसल्याने इमारत मोडकळीस आली. पालकांनी वारंवार शाळा दुरुस्ती, नवीन इमारतीची मागणी केली. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या या शाळेत अत्यंत दर्जेदार शिक्षण दिले जाते. मात्र, शाळा उघड्यावर भरवण्याची वेळ आली.

शाळेत सध्या १३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालकांनी मंगळवारपासून (दि.२२) विद्यार्थ्यांना शाळेतच न पाठविण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षक, मुख्याध्यापक आले, शाळा उघडली, मात्र एकही विद्यार्थी आला नाही. त्यानंतर पालकांनी वाशी तसेच उस्मानाबादच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही कल्पना दिली. मात्र, दिवसभरात एकाही अधिकाऱ्याने शाळेला भेट दिली नाही. जोपर्यंत शाळेची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत शाळेला विद्यार्थी पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.

तर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणारच नाही
वारंवार मागणीनंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली. मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक असून आजपासून एकही विद्यार्थी शाळेत पाठवला नाही. प्रशासनाकडून शाळेच्या नवीन इमारतीबद्दल तातडीने निर्णय हवा आहे. अभिजित खंदारे, पालक, घोडकी

बातम्या आणखी आहेत...