आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सास्तूर चौरस्ता ते सास्तूर रोडवर असणाऱ्या अरुंद व धोकादायक पुलामुळे आत्तापर्यंत वाहनांचे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या पुलाच्या ठिकाणी नवीन मोठा पूल उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून विचारणा केली असता पुढील दहा ते पंधरा दिवसांत या नवीन पुलाचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तालुक्यातील सास्तूर चौरस्ता ते सास्तूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावर एक अरुंद पूल उभारण्यात आला आहे. हा पूल उभारून जवळपास ३० वर्ष झाल्याचे नागरिक सांगतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.
त्यामुळे दुचाकी,चारचाकी वाहनांची नेहमी ये-जा होताना दिसून येते. लोहारा तालुक्यातील उमरग्याला जाणारी बहुतांश वाहने याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. परंतु या पुलाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. या पुलाचे एका बाजूचे संरक्षक कठडेही तुटले आहेत. तसेच या पुलावरून एखादे चारचाकी वाहन जायचे असेल तर समोरून येणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला थांबावे लागते. ते वाहन गेलं की मग वाहनाला यायला संधी मिळते. या प्रकारामुळे वाहनचालकांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर नवीन मोठा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून केली जात आहे. बांधकाम विभागाने लवकरच कामास सुरूवात होणार असल्याचे सांगितल्याने आशा निर्माण झाली आहे.
नवीन पूल १२ मीटर रुंदीचा
सार्वजनिक बांधकाम विभाग लोहाराचे उपअभियंता एस. एस. घोडके यांनी सांगितले की, नवीन होणारा पूल १२ मीटर रुंदीचा असून पूल पूर्ण झाल्यावर भविष्यात वाहतुकीस कसलाही अडथळा निर्माण होणार नाही. या नवीन पुलाचे काम यापूर्वीच सुरू होणार होते. परंतु निम्न तेरणा प्रकल्पातून कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. या पुलाचे काम सुरू केले असते तर ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी सोडण्यात येणारा पाणीपुरवठा करण्यासाठी अडचण निर्माण झाली असती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.