आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे ढोकी येथील दुकान फोडीचा डाव उधळला गेला. येथे शनिवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोर जीपमधून (एमएच २४, व्ही. ५१५२) आले. त्यांनी बार्शी रस्त्यानजीकच्या गजानन समुद्रे यांच्या बांधकाम साहित्याच्या दुकानाचे शटर कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गस्तीवर असणाऱ्या उस्मानाबाद सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाला ते आढळले.
पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी जवळ असलेल्या चोरीच्या जीपमधून पळण्याचा प्रयत्न केला. समोर गस्त पथकाची जीप आल्यावर ते जीप सोडून पळू लागले. गस्त पथकातील पोलिस निरीक्षक के. एस .पटेल, कॉन्स्टेबल प्रकाश भोसले, अनिल मोरे, वाहनचालक काॕन्स्टेबल अमोल कावरे यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतू, अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, आकाश पोतदार यांच्या ज्वेलर्स दुकानाजवळ येऊन सीसीटिव्ही कॕमेरे दिसताच चोरट्यांनी कॕमेरे उलटे केले. दुकानाची बाहेरुन पाहणी करुन ते निघून गेले.
मिरची पावडरही हस्तगत
पोलिसांनी दरोडेखोरांकडून पांढऱ्या रंगाची जीप दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे, मिरची पावडर, कटर,स्प्रे आदी साहित्य हस्तगत केले. दरोडेखोरांनी मुरुड (ता. लातूर) येथून येथील कापड व्यावसायिक प्रमोद सूर्यकांत मगर यांची जीप चोरून आणली होती. याप्रकरणी तेथे गुन्हा दाखल आहे. ढोकीत दरोड्याचा प्रयत्न झाल्याची माहिती देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा आधार घेण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.