आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील सर्वच न्यायालयांमध्ये सोमवारपासून (दि. ९) ई फायलिंग प्रणालीद्वारे कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण कामकाज पेपरलेस होणार असून विधिज्ञ व पक्षकार यांना घरबसल्या प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. सध्या यासाठी लहान प्रकरणे दाखल करण्याची प्रक्रिया होणार असून नंतर मात्र, याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. तसेच न्यायालयातील सर्व दस्तांचेही स्कॅनिंग होणार आहे. देशात मोबाईलची ४ जी सेवा सुरू झाल्यापासून सर्व प्रकारचे प्रशासकीय कामकाज संगणकिय प्रणालीच्या माध्यमातून केले जात आहे.
यासाठी वेगवान इंटरनेट सुविधा मिळाल्यामुळे प्रणालीला यशही आले आहे. महसूल कार्यालयातील सर्व प्रकारची कागदपत्रे मिळवण्यापासून पिकविमा, विविध योजनांसाठीच्या लाभांचे अर्ज दाखल करण्यापर्यंत सर्व प्रणाली ऑनलाईन झाली आहे. अशात आता ५ जी सेवा सुरू होण्याकडे देशाची वाटचाल होत आहे. यामुळे उरलेले सर्व विभाग आता ऑनलाईन प्रणालीचा स्विकार करत आहेत. याला न्यायालयही अपवाद नसून येथेही ऑनलाईन ई फायलिंग प्रणाली विकसित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये सोमवारपासून याची सुरुवात होत आहे. उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायमुर्ती अरूण आर. पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यासाठी रविवारी (दि. ८) सकाळी १० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व न्यायालयातील न्यायाधीश, विधिज्ञ उपस्थित राहणार आहेत.
सुरुवातीला लहान प्रकरणे सुरुवातीला लहान स्वरुपाची प्रकरणे ई फायलिंगद्वारे दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये जामिन, वारसाहक्क, चेक संदर्भातील केसेस आदीचा समावेश आहे. ई - फायलिंग झाल्यानंतर पहिल्या तारखेला काही दिवस ऑफलाईन कागदपत्र दाखल करावी लागणार आहेत. नंतर काही दिवसांनी याची गरज असणार नाही. तसेच प्रकरणांच्या स्वरुपांचीही व्याप्ती वाढवून सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश वसंत यादव यांनी दिली.
असे करता येणार रजिस्ट्रेशन
कोणत्याही पक्षकार, विधिज्ञ, पोलिस, वित्तीय संस्थेला प्रकरणे दाखल करण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यासाठी ई फायलिंगमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करता येईल. सध्या वकिलांसाठी न्यायालयाच्या संकेतस्थळावर लिंक दिसत आहे. अन्य व्यक्तींसाठीही ही सुविधा लवकर उपलब्ध होईल.
विधिज्ञ, पक्षकारांना करावे लागणार रजिस्ट्रेशन
प्रकरण दाखल करणारे विधिज्ञ तसेच आपणहून प्रकरणे दाखल करणाऱ्या पक्षकारांना ई फायलिंगवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. यासाठी मोबाईल क्रमांक, ई मेल तसेच विधिज्ञांसाठी त्यांचा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन करत असतानाचा इनरोल क्रमांक असणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केलेल्यांनाचा प्रकरणे दाखल करता येणार आहेत. पोलिस, पतसंस्था आदी संस्थानाही स्वत: रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
असे होतील फायदे
प्रत्येकवेळी न्यायालयात येण्याची गरज नाही, तारीख पुढे ढकलली तर ऑनलाइन समजणार. यामुळे प्रवास खर्चासह वारंवार न्यायालयात येणे, अन्य खर्चाचही बचत होणार आहे. विरोधी पार्टीच्या वकिलांनी जबाब दाखल करणे स्टेजेस घेतले तर समजून येणार. न्यायालयाने केलेली एखाद्या कागदपत्रावरील ऑर्डर ऑनलाइन पद्धतीने वाचता येणार. समोरच्या विधिज्ञाने दाखल केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास घरबसल्या करता येणार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.