आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेची शैक्षणिक सहल काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांना निसर्गासह ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करता आला. यामुळे त्यांची ज्ञानकक्षा रुंदावण्यास मदत झाली. या पाच दिवसांच्या शैक्षणिक सहलीत खामसवाडी जिल्हा परिषद शाळेतील १७६ विद्यार्थी व १६ शिक्षकांनी सहभाग घेतला. या सहलीसाठी परिवहन महामंडळाच्या चार बस प्रासंगिक करारावर घेण्यात आल्या होत्या.विद्यार्थ्यांनी गडकिल्ले, समुद्र किनारे, धार्मिक स्थळे, ग्रामीण लोकजीवन, भौगोलिक परिसर, विविध प्रकारेच घाट, कोकणची खाद्य संस्कृती अनुभवली.
तसेच हापूस आंबा, सुपारी व नारळाच्या बागा बघितल्या. तसेच काजूगर, मिठागरे, समुद्रातील खाड्या, नौकानयन, शंख-शिंपले, मच्छीमारांचे जीवन, समाधी स्थळे यांच्या प्रत्यक्ष अनुभव घेतला. सहलीत विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतला. सामूहिक वनभोजनाचा आस्वाद घेतला. समुद्र किनाऱ्यावर धमाल केली, पोहण्याचा आनंद घेतला. या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांमध्ये समायोजन साधण्याचे कौशल्य विकसीत झाले. वैज्ञानिक व ऐतिहासिक, भौगोलिक दृष्टीकोन वाढीस लागला. या सहलीच्या यशस्वितेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय रसाळ, सहल विभागप्रमुख सुधाकर सुरवसे, बाळासाहेब वाघमारे यांनी परिश्रम घेतले. डॉ. अशोक शिंपले, अनिल राठोड, गोकुळदास गोरे, शिवाजी कोकाटे, नेताजी वाघ, तुकाराम सुरवसे, संजय लोंढे, बाळासाहेब देशमाने, अंगद जाधव, विलास भंडारे, आसिफ पठाण, सुनीता लिंबोरे, सुदर्शनी कदम यांनी विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळांची माहिती दिली.
अनुभवली निसर्गसंपन्न कोकणाची श्रीमंती सहलीत कोल्हापूर येथील शाहू पॅलेस, महालक्ष्मी मंदिर, कन्हेरी मठ, रंकाळा तलाव, ज्योतिबा, पन्हाळगड, राधा नगरी धरण, रॉक गार्डन येथे विद्यार्थ्यांनी भेट दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, विजयदुर्ग किल्ला बघितला. रत्नागिरी जिल्ह्यात थिबा पॅलेस, हापूस आंब्याच्या बागा, काजूगर, नारळाच्या बागा, खाडी, जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्हा कारागृह, गणपतीपुळे येथे भेट दिली. यासोबतच संगमेश्वर, गरम पाण्याचे झरे, डेरवण, शिवसृष्टी, कोयना धरण व उद्यान, कराड येथील प्रीति संगम, पंढरपूरलाही भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.