आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याचा मूक साक्षीदार नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबाद पुलाला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी दिली. तसेच देशाचे पहिले अशोक चक्र पुरस्कार प्राप्त, हा पूल वाचवताना शहीद झालेले जवान बचित्तर सिंह यांचे येथे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नांचीही त्यांनी ग्वाही दिली.
अलियाबाद पुलाचे मराठवाडा मुक्तिसंग्रामात मोठे योगदान आहे. भारतीय सेना आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी निझामाने त्यावेळी हा पूल उडवून देण्यासाठी पुलाखाली दारूगोळा ठेवला होता. मात्र, भारतीय सेनेतील जवान बचित्तर सिंह यांनी तो दारूगोळा नष्ट केला. यात ते जखमी होऊन शहीद झाले.
मिश्रा यांनी गुरुवारी या ऐतिहासिक पुलास भेट देत दिली. मिश्रा यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर संविधान चौकात शहर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मिश्रा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
मिश्रा यांच्यासोबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. अलियाबाद पुलाजवळ कार्यक्रमात माजी नगरसेवक नय्यर जहागीरदार, उदय जगदाळे,संजय बताले, भाजपच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर, भाजपा शहराध्यक्ष धीमाजी घुगे, श्रमीक पोतदार, सागर हजारे, उमेश नाईक, मुदस्सर शेख, अबुल हसन रजवी यांनीही सत्कार केला. त्यांना नळदुर्ग किल्ल्याची प्रतिमा भेट देण्यात आली. सचिन घोडके, धनगर समाजाचे सुनिल बनसोडे यांनी अजयकुमार मिश्रा यांचा घोंगडी देऊन सत्कार केला.
महामार्गाच्या कामाला गती देणार
मिश्रा यांनी मैलारपूर येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतले. या ठिकाणी खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खंडोबा मंदिराजवळून गेलेल्या व गेल्या अनेक वर्षापासुन रखडत पडलेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. हे काम लवकर पुर्ण व्हावे यासाठी आपण संबंधित मंत्रालयाला कळवणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
धगधगत्या इतिहासाचा साक्षीदार पूल : सिंह यांनी जिवाची पर्वा न करता हा पूल वाचवला. त्यात त्यांना वीरमरण आले. सिंह यांच्या शौर्याची दखल घेत भारत सरकारने सन १९५२ साली सिंह यांना देशातील पहिले अशोक चक्र प्रदान करण्यात आले. हा धगधगता इतिहास ऐतिहासिक नळदुर्ग शहर व पुलाचा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.