आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काैटुंबीक बैठक:लोहारा तालुक्यातील 13 ग्रा.पं.त हाेणार निवडणुका, गावकीचा भावकीचा आखाडा

लोहारा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या लाेहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे उमेदवारांच्या चाचपणीसाठी सध्या गावागावात चाैक, काॅर्नर व काैटुंबीक बैठका होत असून गावकी अन् भावकीचा आकाडा पेटत आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झाले होते. या निवडणुकीच्या अनुषंगाने संगणकीय प्रणालीवर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली असून यासाठी ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे.

त्यानुसार १३ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर निवडणूक आयोगाने हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि गावपुढाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. ५ डिसेंबर रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील.

त्यानंतर त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येईल. १८ डिसेंबर राेजी मतदान होणार असून २० डिसेंबर राेजी मतमोजणी होऊन निकाल घोषीत करण्यात येणार आहे. राज्यात मागील तीन महिन्यात झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपली ताकत दाखवण्याची ही संधी आहे. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने आगामी काळात काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या ग्रामपंचायतीत हाेणार निवडणुका लोहारा तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, वडगाव गांजा, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. गावपुढाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु, सध्या उमेदवारांच्या चाचपणीसाठी गावोगावी गुप्त बैठका होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच सरपंच पदही जनतेतून निवडले जाणार असल्याने सरपंच पदासाठी कोणता उमेदवार द्यायचा यासाठीही बैठका होत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...