आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकल मराठा समजाच्या वतीने १९ सप्टेंबरला कळंब येथील महामोर्चानंतर परंड्यात ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण महामोर्चा काढण्यात आला. यापूर्वी उस्मानाबादेत २४ सप्टेंबरला हिंदू शिवगर्जना मेळाव्यात मराठा मोर्चाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात मंगळवारी (दि.८) मराठा वादळ निर्माण झाले. महामोर्चात तालुक्यातील खेड्यापाड्यातील मराठा समाजाचे नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. आयोजकांनी एक लाख मोर्चेकरी आल्याचा दावा केला असून पोलिसांनी २५ हजार नागरिक सामिल झाल्याचे म्हटले आहे.
महामोर्चात ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण नाही तर मतदान नाही’, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. महामोर्चात शिस्तीचे पालन करुन हजारो समाजबांधव एका रांगेत आपल्या हक्कासाठी परंडा शहरात एकत्र आले. पाच वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षणासाठी राज्यातील सकल मराठा समाजाने शांततामय मार्गाने ५८ मोर्चे काढले होते. परंतु, अद्यापही आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने परंड्यात आरक्षण महामोर्चा घेतला. मोर्चात छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत युवक घोड्यावर स्वार झाला होता. मावळ्यांसह घोड्यावर स्वार प्रतिकात्मक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांचे लक्ष वेधले.
सकाळी १० पासून कडक ऊन्हाची पर्वा न करता हजारो मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले. ११ च्या सुमारास मोर्चास सुरवात झाली. शहरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय होता. छत्रपती संभाजी महाराज चौकातून महामोर्चा सुरू झाला. नाथ चौक, संतसेना चौक मार्गावरुन शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून दुपारी २ वाजता कोटला मैदानावर मोर्चा स्थिरावला. येथे ५ मुलींची भाषणे झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांना निवेदन देण्यात आले.
काय म्हणाले होते प्रा. डॉ. तानाजी सावंत
उस्मानाबादेत २४ सप्टेंबरला आयोजित हिंदू शिवगर्जना मेळाव्यात आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत म्हणाले होते की, गेल्या अडीच वर्षात मराठा आरक्षणासाठी मोर्चे का काढले नाहीत? आताच सत्ता बदल होताच मोर्चे काढले जात आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मागणे म्हणजे समाजात भांडण लावण्याचा प्रकार आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, अन्यथा मी राजकारण सोडणार, असा दावाही सावंत यांनी केला होता. या वक्तव्यावर वादानंतर डॉ. सावंत यांनी माफीही मागितली होती.
यावेळी मागण्या बदलल्या मराठा क्रांती मूकमोर्चा व आताच्या महामाेर्चात मागण्या बदलल्या. मूकमोर्चात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण, शेतमालाला हमीभाव, अॅट्रसिटीचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात दुरूस्ती आदी मागण्या होत्या. यावेळी मागण्यामध्ये बदल झाला आहे.
मोर्चकऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या {मराठा समाजाला विदर्भ व खान्देशातील कुणबी मराठ्यांप्रमाणे ओबीसीतून ५० % आतील आरक्षण द्या. {मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, लेवा पाटील, लेवा-मराठा व मराठा हे सर्व एकच असल्याने सरसकट ओबीसीत समावेश. {कुणबी संबोधण्याची अधिसूचना निर्गमित होईपर्यंत ५ एकर जमिनीची अट शिथिल करुन ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळावा. {शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वामीनाथन आयोग त्वरीत लागू करावा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती सुरु करावी. {सारथी संस्थेला पूर्णवेळ अधिकारी वर्गाची नेमणूक करून भरीव तरतूद करा, जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह काढा. {अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज मर्यादा व व्याज परतव्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.