आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बेंबळी येथे विविध योजनांमध्ये अपहार करण्यात आला असून याला सध्याचे सरपंच व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करून याप्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपसरपंचांसह नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, सरपंचांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
यासंदर्भात विभागिय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंच व तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी. दलित वस्ती सुधार योजना, विद्युतीकरण, जलजिवन मिशनअंतर्गत प्राप्त निधी, तांडा वस्ती सुधार योजना, १५ वा वित्त आयोग, इतर विविध योजनेच्या प्राप्त निधीत अपहार व अनियमितता करण्यात आली आहे. कामे न करता बोगस पावत्या दाखवुन लाखो रुपये घेऊन अपहार केला आहे. कामांना प्रशासकिय मान्यता नाही. ग्रामसभेत सदस्यांना अथवा नागरिकांना कुठल्याही कामाची प्राप्त निधीची कल्पना न देता सरपंच ग्रामसेवक यांच्या संगनमताने निधी हडप करुन अपहार केलेला आहे.
खरेदी केलेल्या कामाची कुठल्याही प्रकारची ई-निविदा अथवा टेंडर केलेले नाही. याप्रकरणी कारवाई करावी, अन्यथा आगामी सोमवारपासून (दि. १९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर उपसरपंच नितिन इंगळे, नवाब पठाण, अनिल नळेगावकर, जिंदाशहा फकीर, मनीषा नागनाथ पाटील, फातिमा सत्तार शेख, बाळासाहेब कणसे, सुफिया अहमद शेख, यास्मीन मोईन खान आदींच्या स्वाक्षऱ्यात आहेत.
विराेधकांच्या आरोपात तथ्य नाही,विकासकामे करणार यासंदर्भात सरपंच वंदना कांबळे यांना विचारले तर त्यांनी सांगितले की, विरोधकांनी राजकीय द्वेषातून निवेदन दिले आहे. त्यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही. जे विकासाला विरोध करत आहेत, यामागे त्यांचा आर्थिक लाभाचा हेतू असू शकतो. तरीही अशा विरोधकांचा विरोध पचवून गावातील विकासकामे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी जे सत्तेत होते, त्यांनी विकासापेक्षा जास्त केलेले अनपेक्षित राजकारण सर्वश्रुत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.