आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:जकेकुरवाडी जिल्हा परिषद शाळेत लोककला सादरीकरणाद्वारे प्रबोधन

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंगात पोलिसांची वर्दी, हातात खेळण्यातील बंदूक, तोंडात शिट्टी, डोक्यावर टोपी, कमरेला पोलिस पट्टा आणि खांद्याला अडकवलेली कागदपत्रांची फाटकी पिशवी घेवून शाळेतील विद्यार्थ्यांचे यडोळा येथील बहुरूपी (राईंदर) प्रकाश सावंत यांनी मनोरंजन केले. तसेच विद्यार्थ्यांना विविध लोककलेची माहिती व्हावी, यासाठी शाळेने कार्यक्रम घेतला.

उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पारंपरिक लोककला व लोककलावंतांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी मंगळवारी (२०) लोककला उपक्रम घेण्यात आला, त्यावेळी राईंदर प्रकाश भीमराव सावंत यांनी मनोरंजन व प्रबोधन केले. आजही महाराष्ट्रात विविध कला प्रकारचे लोककलावंत आहेत. बहुरूपी हा त्यातीलच एक प्रकार आहे. कलाकार कोणाचीही हुबेहूब नक्कल करत सर्वांना आनंद देवून उपजीविका भागवतात. यामध्ये प्रामुख्याने फौजदार, शंकर, हनुमान यांचे वेष धारण करून गावोगावी फिरून आपल्या संसाराचा गाडा हाकतात.

मात्र, आज या बहुरूपी कलावंतांचे हाल आहेत. मोबाईलच्या रूपाने करमणुकीचे साधन थेट हातात आल्यामुळे बहुरूपी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोलिसांच्या वेशात येणाऱ्या या कलावंतांना भामटे व फसवेगिरी करणारे लोक समजून त्यांना जनतेच्या रोषाला देखील अनेकदा सामोरे जावे लागते, असे सावंत म्हणाले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रमोद मोरे यांनी आभार मानले. मुख्याध्यापक बालाजी दुधनाळे यांनी सावंत यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक रघुवीर आरणे, बालाजी कदम, प्रमोद साखरे, मल्लिकार्जुन कोळी, अमिता वाघवसे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जगणे मुश्किल
मागील दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण घडी विस्कटून गेली आहे. सामान्य माणसांचे जगणे मुश्किल बनले आहे. हाताला काम नसल्याने बेकारीसुद्धा वाढली आहे. कलाकारांचे हाल तर त्याहून अधिक खराब बनले आहेत. ग्रामीण भागातील कलाकार आता शहरी भागात आपली कला सादर करून उपजीविका करू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...