आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी प्रतीक्षेत:ऑगस्ट संपत येऊनही केवळ 63 टक्के पीककर्ज वाटप, खासगी बँकांची कुचराई

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट संपत आला तरी पीककर्ज वाटपाचा टक्का ६३ वरच रेंगाळला आहे. खासगी बँकांचा अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चांगलीच भरारी घेतली असून या बँकेचा टक्का १०१ वर गेला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या कर्जाचे परस्पर नुतनीकरण करते. यामुळे या बँकेचा टक्का ६७ वर असून यामुळे एकत्रित बँकांच्या वाटपाचा टक्का वधारल्याचा आभास होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी धुरा हातात घेत असतानाच शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिलासा देण्याची घोषना केली होती. शेतकऱ्यांना उर्जितावस्था देण्यासाठी पिककर्ज महत्त्वाचे माध्यम आहे. परंतु, पिककर्जाबाबत बहुतांश बँका ऑगस्ट संपत आला तरी सकारात्मकता दाखवत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्याचे ठरवण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी अडथळे येत आहेत. जिल्ह्याला यावर्षी १३६८ कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने यावर्षी पीककर्ज वाटपात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. २३५ कोटी ३७ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना या बँकेने २३७ कोटी ४६ लाख वितरीत करून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वितरण केले आहे. म्हणजेच या बँकेची टक्केवारी १०१ वर गेली आहे. या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कर्जदाराला भेटून पिककर्ज नूतनीकरण करण्याचे आवाहन केले होते.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाडाझडती
खरिपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आता अवघा एक महिना उरला आहे. अशा परिस्थितीत ३७ टक्के उद्दिष्ट साध्य झाल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यामध्ये मागे पडलेल्या बँकांची झाडझडती घेतली जाणार असल्याचे समजते.

५० हजारांच्या अनुदान योजनेचाही परिणाम
जिल्ह्यात अनेक शेतकरी कर्ज घेतात मात्र, नूतनीकरण,परतफेड करत नसल्याच्या बँकांच्या तक्रारी आहेत. मात्र, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. याचा शासननिर्णयही निर्गमित करण्यात आला. योजना घोषित केल्यामुळेही अनेक शेतकऱ्यांनी परतफेड करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.

मागे पडलेल्या बँकांना नोटीस
पीककर्ज वाटपाचा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्यात सुरू आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात आढावा घेऊन मागे पडलेल्या बँकांना नोटीस देण्यात येणार आहे.
सुनील शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक.

बातम्या आणखी आहेत...