आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शानदार समारोप:कडाक्याच्या थंडीतही वाढला शहरावर खो-खो स्पर्धेचा ज्वर

उस्मानाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या खो - खो स्पर्धांना शहरातील नागरिकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहेत. कडाक्याच्या थंडीतही रात्री उशिरापर्यंत सुरु असलेले सामने पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. विशेष म्हणजे मुलांसह, महिला, तरुण- तरुणी आणि ज्येष्ठांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. अंतिम सामने पाहण्यासाठी एक तास अगोदरच नागरिकांनी गर्दी केली होती. दुसरीकडे नागरिकांची आयोजकांचे तर खेळाडूंनी आयोजकासह उस्मानाबाद करांचे आभार व्यक्त केले. तसेच देशभरात पहिल्यांदाच नागरिकांचा खो-खो प्रती उत्साह पाहून खेळाडूही भारावून गेल्याचे त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

जिल्ह्यात पहिल्यांदाच मॅट वर खो-खो च्या महिला आणि पुरुष गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन डॉ. चंद्रजीत जाधव यांनी आयोजन केले आहेत. या स्पर्धांना मिळत असलेला नागरिकांची उपस्थिती अभूतपूर्व आहे. श्री तुळजाभवानी क्रीडा स्टेडियमवर आता पर्यंत झालेल्या क्रिकेटसह सर्वच स्पर्धांपेक्षा खो-खो स्पर्धेला होत असलेली गर्दी प्रचंड अविश्वसनीय आहे. पहिले चार दिवस सकाळ पासून दुपार पर्यंत पहिल्या सत्रात आणि दुसऱ्या सत्रात सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री साडेनऊ पर्यंत मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण करण्याचे काम उस्मानाबाद-कर करत आहेत.

यामुळे खेळाडूंनाही घरच्या मैदानावर खेळत असल्याची अनुभूती मिळत आहेत. सामना दिल्लीचा असो की, कर्नाटकचा यात आवाज मात्र, स्थानिकांचा असल्याचेही चित्र प्रत्येक अटीतटीच्या सामन्यात बघावयास मिळत आहे. मैदानावर करण्यात आलेल्या बैठक व्यवस्थाही नागरिकांच्या उपस्थितीमुळे कमी पडत आहे. नागरिकांच्या उपस्थितीत जुन्या खेळाडू, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अंतीम सामन्यांसाठी गाड्या भरुन भरुन बाहेर गावातून प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. यात खेळाडूंसह, तरुण, तरुणी आणि उत्साही पालकांचाही सहभाग होता.

नागरिकांकडून आम्हाला आदर मिळाला
आता पर्यंत मी ३० राष्ट्रीय स्पर्धा खेळले आहेत. मात्र, पहिल्यांदा उस्मानाबाद मध्ये आम्हाला नागरिकांकडून असा आदर, सन्मान मिळत आहेत. आमच्या जेवणाची, राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांचा मिळणारा प्रतिसाद आमच्या खेळण्यांतील उत्साह द्विगुणीत करत आहे. इतर खेळांपेक्षा प्रेक्षकांनी खो-खो खेळास पसंती दिली, त्याचा आम्हाला खेळाडू म्हणून अभिमान आहे. यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे. -प्रियंका सिंग, खेळाडू, ओडीसा,

डॉ. जाधव सरांचे मार्गदर्शन लाभले नाही
आमच्या जोरावर मी तीन राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. विद्यापीठ स्तरावर संघाचे प्रतिनिधीत्व करु शकले. आता तो प्रकार राहिला नाही. आम्हालाही डॉ. चंद्रजीत जाधव सरांचे मार्गदर्शन लाभले असते तर, आजचे चित्र आमच्याबाबत अधिक वेगळे असते. मला खोगरे सर, सोनवणे सर, ताकभाते सर, उंबरे सर यांनी बळ दिले होते. आताही जाधव सर अनेक गरीब विद्यार्थ्यांना स्वखर्चाने बळ देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आजच्या स्पर्धा भविष्यातील खेळाडू निर्माण करणार आहेत.-स्मिता वाघ -आचार्य, माजी खेळाडू.

मुलांसह, नवीन खेळाडूंना प्रेरणा
अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिले. त्यामुळे मुलांना आणि नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळते. यातून खेळाडू घडतात, नवीन तयार होतात. आता पर्यंत शहरात जे दोन मोठे राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम झाले. त्या पेक्षाही ही स्पर्धा अधिक उत्साह देणारी आणि प्रेरणा देणारी आहे. मैदानी खेळातून आरोग्यही उत्तम राहते. त्याची आज सर्वांनाच गरज आहे. ही स्पर्धा नागरिकांसाठी वेगळीच पर्वणी ठरणार आहे.-बी. के. साळुंके, स्थानिक.

मैदानावर, शिट्या, टाळ्यांचा कडकडाट
आतापर्यंतच्या सामन्यापेक्षा इथे होणारे आजचे सामने अंतीम असल्याने तसेच विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या गटातील खेळाडूंची पराकाष्ठा सुरु होती.सारे वातावरणच चैतन्यमय होते. त्यावेळी प्रत्येक खेळाडू जिवाच्या आकांताने खेळ करत होता. त्यावेळी खेळाडूला बाद करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे खेळाडू बाद झाल्यावर उपस्थितांच्या शिट्या, टाळ्यांचा कडकडाट होत होता.

तुळजाभवानी, महादेव मंदिर दर्शन लाभले
महाराष्ट्रात येऊन उस्मानाबादला पाच दिवस राहिलो आणि आई तुळजाभवानीचे दर्शन झाले नाही, असे होणार नाही. मी प्रारंभी देवीचे दर्शन घेतले. लेण्या बघितल्या, महादेव मंदिरातही जाऊन आलो. इथल्या मातीत खेळाडूंसाठी प्रेम असल्याचे दिसले. इथल्या नागरिकांनी कोणतीही हुल्लडबाजी केली नाही. पाहुण्यांना देव मानले. आम्हाला व खो- खो खेळाला प्रेरणा दिली. इथली स्पर्धा आणि आयोजन कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेच्या तुलनेत वरच्या स्तराची आहे. आयोजक व उस्मानाबाद करांचे आभार. -भुपेंद्र चौधरी, कोच राजस्थान टीम.

महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
स्पर्धेची वाढलेली उत्कंठा आणि सामने बघण्यासाठी महिलांची होणारी गर्दी लक्षात घेऊन गुरुवारी होणारा अंतीम सामना पाहण्यासाठी आयोजकांनी स्वंतत्र गॅलरी उपलब्ध करुन दिली होती. पूर्ण गॅलरी भरूनही अन्य गॅलरीत महिला असल्याचे दिसून आले. अनेक महिला आपल्या मुलांसोबत हा खेळ बघण्यासाठी आल्या होत्या. महिलांना गर्दीची जाणीव असल्याने अनेक जण सामना सुरु होण्यापूर्वी एक तास अगोदरच येऊन बसल्या होत्या.

अशा स्पर्धेतूनच मी घडले
सातव्या वर्गात असताना राष्ट्रीय पातळीवर खेळले. घरातून सहकार्य मिळाले. त्यामुळे अधिक चांगली प्रगती करता आली. राष्ट्रीय व ऑल इंडिया विद्यापीठ स्तरावर मी खेळले आहे. प्रारंभी केवळ राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा मर्यादित होती. त्याचा आता विस्तार झाला असून एशियन गेम पर्यंत हा खेळ गेला. पूर्वी आहार, फिजिओ, योगा आदींचा समावेश नव्हता. या खेळावर पूर्वी पूणे, मुंबईची मक्तेदारी होती. ती पुसून काढत उस्मानाबाद पुढे गेले. डॉ. जाधव सरांचे आभार, त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली. -चंद्रशोभा जाधव, वाकुरे, माजी खेळाडू.

जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल
या स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात खेळाडू तयार होतील. जाधव सरांनी यांचे आयोजन करुन शहर आणि जिल्ह्यातील लोकांना एक खेळ नव्याने माहिती करुन दिला. अगोदर याकडे कुणी लक्ष देत नव्हते. आता यास चांगले दिवस येतील. आता पर्यंत दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. यावेळची स्पर्धा अधिक चांगल्या दर्जाची होत आहेत. मी हा खेळ सोडला होता. आज मला त्याचा पश्चात्ताप होत आहे. अशा होणाऱ्या स्पर्धांमुळे एक चेतना मिळते. -विवेकानंद साळवे, स्थानिक.

बातम्या आणखी आहेत...