आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात दरवर्षी साचते पाणी २ विभाग पाण्यात ; कायमस्वरुपी उपाययोजना नाही

उमरगा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पाच वर्षांपूर्वी नव्याने उभारलेल्या तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात पावसाळ्यात मागील चार ते पाच वर्षांपासून पाणी साचत आहे. तालुक्यात १२ दिवस झालेल्या संततधार व मोठ्या पावसाने तहसीलच्या तळमजल्यात पाण्याचे झरे सुरू झाले आहेत. परंतु संबंधीत विभाग व लोकप्रतिनिधी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

तहसीलच्या इमारतीचे काम सुरू करण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व कंत्राटदारांना भविष्यात या इमारतीच्या तळमजलात पाणी थांबेल, याची कल्पना ही आली नसेल काय? आली असल्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले काय? तळमजल्यातील पाण्यासंदर्भात तहसील कार्यालयाकडून प्रत्येक पावसाळ्यात पत्रव्यवहार होतो, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करतात. मात्र पर्यायी उपाययोजना होत नाही. संबंधीत विभागाच्या अभियंत्यांना हे कशामुळे घडते, यावर उपाय शोधता येईल याची माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात येत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. तहसील कार्यालयाची इमारत राष्ट्रीय महामार्गापासून लांब आहे. या कार्यालयात जाण्यासाठी कर्मचारी व नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागतो. इमारतीच्या बाजुने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला दुसरीकडून वाटच नाही, अशी स्थिती असताना या कोट्यवधींच्या इमारतीची रचना कशी केली गेली, याबाबत उलट-सुलट चर्चा होते. प्रत्येक वेळी नव्याने रूजू झालेल्या तहसीलदारांकडून पर्यायी उपाययोजनेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला जातो. मात्र त्यावर तोडगा निघत नाही. दरम्यान, यंदा दमदार पावसाची सुरुवात उशिरा झाली व जमिनीत मुरलेल्या पाण्याचे झरे सुरु होवून तळमजला स्विमिंग तलाव झाला आहे.

महिनाभर राहते पाणी, सेतू केंद्र खासगी जागेवर, अभिलेख कक्ष पाण्याखाली
तहसीलच्या तळमजल्यात दरवर्षी महिनाभर पाणी साचते. त्यामुळे सेतू सुविधा केंद्र खासगी जागेवर सुरू आहे. निवडणूक विभाग दोन वर्षांपासून वरच्या मजल्यावर आहे. मागील चार दिवसांपूर्वी सायंकाळी झरे सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विशेष सहाय्य योजना, अभिलेख कक्ष पाण्याखाली गेला. येणाऱ्या काळात जोरदार पाऊस झाला की, पुरवठा विभागही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुरवठा विभागातील महत्वाचे साहित्य अन्यत्र हलवण्याची धावपळ सुरू केली आहे.

अंदाजपत्रकास मंजुरी नाही
तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात पाणी साचण्याचा हा प्रकार तात्पुरता बंद होण्यासाठी नाला बांधकामासह तत्सम कामासाठी साधारणतः पाच लाख रुपये खर्च होणे अपेक्षित असल्याने एक वर्षापूर्वी डीपीडीसीकडे अंदाजपत्रक वरिष्ठ विभागाकडे पाठवले आहे. मात्र, अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.
संजय विभूते, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.

बातम्या आणखी आहेत...