आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळदुर्ग मंडळ:1130 एकर जमिनीवर वर्ग-2 ची नोंद घेतल्यामुळे शेतकऱ्यात खळबळ

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग मंडळ अंतर्गत असलेल्या ६ सज्जा मधील १९ गावातील जवळपास ११३० एकर जमीनीवर भोगवटादार वर्ग दोनची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह प्लॉट धारकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने संबंधित शेतकरी तसेच प्लॉटधारकांना याबाबत नोटीसही बजावली आहे.

देवस्थान इनाम जमीन, वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील असलेल्या जमिनी, कुळाच्या जमिनी, सिलिंग कायद्याअंतर्गत वाटप झालेल्या जमिनी तसेच काही वेगवेगळ्या वतनाखाली दिलेल्या जमिनींचा यामध्ये समावेश आहे.उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नळदुर्ग सज्जा तलाठी यांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी या नोंदी घेतल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी याला मंजुरी दिली आहे.

नळदुर्ग मंडळ अंतर्गत १९ गावांमध्ये जुन्या अभिलेखाचे पडताळणी करण्यात आली होती.यामध्ये ३७५ शेतकरी प्लॉटधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.या नोटिसमध्ये संबंधितांनी उपस्थित राहुन आपले म्हणणे सादर करावे अन्यथा आपले कांहीही म्हणणे नाही असे समजून सदरचा फेरफार रद्द करून सदरील जमीन शासन दरबारी जमा करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रस्तावित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. या नोटीसनंतर २६ नोव्हेंबर रोजी ७५ जणांनी मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. या प्रस्तावाची तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.१२ मे २०२२ या तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार तलाठी, मंडळ अधिकारी यांनी जुने अभिलेखे तपासल्यानंतर त्यामध्ये वर्ग २ हा प्रकार या जमिनीमध्ये असल्याचे निदर्शनास आले होते.

नळदुर्ग शहरांतील ज्या जमिनी भोगवटादार वर्ग २ झालेल्या आहेत त्यामध्ये शासकीय विश्रामगृह शहरालगतच्या अक्कलकोट रोडवरील गणेश खिळा, कळवातीनचे शेत,पाटीलतांडा, जकणीतांडा,कंदुरमळा,इंदिरानगरजवळील भाग,बोरीधरण लगत,मैलारपुर जवळील गव्हाणेपट्टा.किल्ल्याजवळील दक्षिणभाग आदींचा समावेश आहे.शासनाकडून भोगवटादार वर्ग २ इनाम, वक्फ बोर्ड जमीन,सिलिंग कायद्याअंतर्गत जमिनीचा मुळ प्रयोजनासाठी वाटप होतोय की नाही हे तपासले जात आहे.शिवाय चुकीच्या पद्धतीने झालेले फेरफार रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.नळदुर्ग मंडळांतर्गत जवळपास ११३० एकर जमिनीवर भोगवटादार वर्ग २ असा करण्यात आला आहे.

आता जमिनी विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही
नळदुर्ग सर्कलमधील नळदुर्ग सज्जा:- नळदुर्ग, रामतीर्थ, अलियाबाद, येडोळा, मानेवाडी, अणदुर सज्जा:- अणदुर, फुलवाडी, धनगरवाडी, खुदावादी सज्जा:-- खुदावाडी, वागदरी, सराटी, चिवरी सज्जा:-- चिवरी, उमरगा चिवरी, आरळी (बु) सज्जा:-- आरळी (बु),आरळी (खु),बसवंतवाडी, चिंचोली.होर्टी सज्जा:-- होर्टी, मुर्टा या गावांतील एकुण ४५२ हेक्टर(११३० एकर) जमीन,३७५ शेतकरी व ११५ सर्व्हे नंबर बाधित झाले आहेत.

भोगवटादार क्रमांक दोनच्या जमिनी म्हणजे इनामी (देवस्थान) जमिनी, वक्फ बोर्डाच्या जमिनी,वन, गायरान,कुळाच्या तसेच वतनाच्या जमिनी असतात.या जमिनी विकण्याचा अधिकार संबंधित शेतकऱ्यांना नसतो.इनामी किंवा वक्फच्या जमिनी या संबंधित मंदिर किंवा मशिदीच्या सेवेसाठी दिलेल्या असतात.आता शेकडो एकर जमीन भोगवटादार वर्ग दोन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच ज्यांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत त्यांचेही धाबे दणाणले आहेत. पुढे काय होणार याची त्यांना चिंता आहे.

संबंधितांना नोटीसा बजाविल्यानंतर आलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू
वर्ग २ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना व प्लॉटधारकांना मंडळ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी ७५ जणांनी कागदपत्रे सादर करुन आपले म्हणणे मांडले आहे. त्याची छाननी सुरू असून छाननीनंतर संबंधित कागदपत्रे उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात सादर केल्यानंतर अंतिम निर्णय जिल्हाधिकारी उस्मानाबाद किंवा उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद हे घेतील.
जयंत गायकवाड, मंडळ अधिकारी,नळदुर्ग

बातम्या आणखी आहेत...