आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांकडून पाहणी:तामलवाडीतील विस्तारीत एमआयडीसीच्या कामांना गती, दहा हजार रोजगार मिळणार

तामलवाडी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरील तामलवाडी येथे मागील काही वर्षांपासून एमआयडीसीचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू होती. यासाठी अनेक वेळा जागेची पाहणी करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून यासाठी हिरवा कंदील मिळत नव्हता. त्यानंतर नवीन सरकरामधील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची एमआयडीसीबाबत दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडीच नाही तर नळदुर्ग, शिराढोण, कळंब आदी ठिकाणीही नवीन एमआयडीसी मंजुरीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर लगेचच लातूरच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच तामलवाडी येथील जागेची पाहणी केली. त्याचा सकारात्मक अहवालही शासनास पाठवणार आहेत.

मागील अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या नवीन वाढीव एमआयडीसीची चर्चा आता कुठे प्रत्यक्षात उतरत असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. अनेक दिवस सुरु असलेल्या पाहणी कार्यक्रमानंतर अखेर औद्योगिक क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात येऊन स्पॉट पाहणी केली. त्यामुळे आता लवकरच एमआयडीसीच्या कामांना सुरुवात होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.

एमआयडीसीाठी तामलवाडी येथे प्रारंभी ४०० एकर औद्योगिक क्षेत्र विकसित होणार आहे. यानंतर उद्योजकांच्या मागणीनुसार वाढीव क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. या एमआयडीसीत दहा हजार युवक-युवतींना नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या एमआयडीसीत प्रारंभी सोलापूर, पुणे आणि कर्नाटकातील अनेक उद्योजक याठिकाणी मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती राणा पाटील यांनी दिली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये सोलापूर व इतर ठिकाणचे अनेक उद्योजक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत, यावर सविस्तर चर्चा झाली.

उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित
जिल्हा आकांक्षित असल्यामुळे येथे उद्योजकांना प्रोत्साहनपर गुंतवणुकीच्या १०० टक्के कर सवलत व इतरही बऱ्याच सुविधा मिळतात. राष्ट्रीय महामार्गासह आगामी काळात रेल्वे मार्गामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यवसायांना वाव आहे. सुरूवातीला किमान दहा हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन पुढील आखणी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासात मोठ्या प्रमाणात सुविधा विकास होणार असल्याचे संकेत देण्यात येत असून एमआयडीसीच्या कामांनी गती घेतली आहे.

तालुक्याचा कायापालट
मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरील तामलवाडी येथे यापूर्वी कटारे स्पिनिंग मिल, बालाजी अमाइन्स, किसान इरिगेशन व इतर दहा ते बारा कंपन्या आहेत. सोलापूर- तुळजापूर- औरंगाबाद असा चार पदरी महामार्ग पूर्ण झाला आहे. आता याच भागातून सुरत-चेन्नई हा आठ पदरी भव्य महामार्ग जात आहे. याचबरोबर आई जगदंबेच्या दरबारात रेल्वेची सोय करण्यासाठी रेल्वे मार्गाचे नुकतेच भूसंपादन सुरु झाले आहे. यात भरीस भर म्हणून एमआयडीसी सुद्धा मोठ्या डौलाने उभी राहणार असल्याने तुळजापूर तालुक्याचा संपूर्ण कायापालट होणार आहे.किशोर कटारे, उद्योजक.

रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष : आमदार राणा पाटील
जिल्ह्याचा विकास करताना आता आपण रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तामलवाडी येथे नवीन औद्योगिक क्षेत्र उभारण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यानुसार लातूरच्या एमआयडीसी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ही पाहणी करुन घेतली आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुण-तरुणींना कामासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

बातम्या आणखी आहेत...