आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील अनेक दिवसांपासून कांद्याचे दर गडगडलेले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली आहे. अनेक शेतात कांदा काढणीअभावी पडून आहे. अतिवृष्टीमध्ये सपाटून नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची पूर्ण भिस्त कांद्यावरच होती. परंतु, आता दर घसरल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जीवापाड कष्ट करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने बळीराजाला अश्रू अनावर होत आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पिकासाठी केलेला खर्चही शेतीमालातून येत नसल्याने आता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा वाढत जात आहे. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने कांदे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार की काय, अशी भीती परिसरात व्यक्त केली जात आहे. सध्या ईट परिसरात अनेक शेतकऱ्यांनी फडातून कांदा बाहेर काढलेला नाही. कांदा शेतात तसाच काढणीअभावी पडून आहे. अनेकांनी कांदा तसाच उपटून शेतात ढिग लावून ठेवला आहे. शेतकऱ्यांना कांदा बाजूला काढण्यासाठी धीरही होत नाही.
यामुळे तसाच कांदा पडून आहे. कांदा काढून बाजूला काढणे, तेथून तो व्यवस्थितपणे आडतीवर पाठवणे आदीचा खर्च न केलेला बरा, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे परिसरातील शेकडो एकरवर कांदा तसाच पडून आहे. सातत्याने भाव कोसळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हताश होत चालला आहे. कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांत नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा कांदा उत्पादनावर केंद्रीत झाल्या होत्या, परंतु त्यावरही पाणी फेरले.
सरकारने युक्तिवाद नको अनुदान जाहीर करावे
सरकारने केवळ युक्तिवाद करून कांदाप्रश्नी शेतकऱ्यांची चेष्टा करू नये. शेतात दहा रुपये गुंतवले तर प्रत्यक्षात पाच रुपये मिळणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कांद्याला अनुदान जाहीर करावे. अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होतील. - अंनत डोके, तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, भूम.
मजुरी, वाहतूक खर्चही निघेना
सध्या कांद्याचा उत्पादन खर्च तर निघालाच नाही. मात्र, काढण्यासाठीची मजुरी व वाहतूक करण्याचाही खर्च निघण्याची शक्यता नाही. यामुळे शेतकरी कांदा हा शेतातच पडून ठेवण्यात धन्यता मानत आहेत. सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने मिळून कांद्याच्या नुकसानीबद्दल अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे.
सर्वसामान्यांना दिलासा, शेतकऱ्यांचे काय?
महागाईच्या काळात कांदा सर्वसामान्यांना दिलासा देत आहे तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. घटती मागणी आणि वाढलेल्या उत्पादनामुळे मागील काही दिवसांपासून कांद्याला २ ते १० रुपये किलोपेक्षा अधिक दर मिळाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.