आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:खरीप अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी ; तो न्यायाची वाट बघत आहे

अणदूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बळीराजास संकटकाळी मदतीचा हात देण्याऐवजी त्याला कशाप्रकारे नाडले जाते, याची अनेक उदाहरणे असताना आता सन २०२०-२१ चे उर्वरित खरीप अनुदान देण्यास तुळजापूर तहसील कार्यालयाच्या अक्षम्य दुर्लक्षाने नाहक विलंब झाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गतवर्षी अतिवृष्टीने सोयाबीन हातचे गेल्याने पीकविमा मिळेल, अशी आशा बाळगून असलेला शेतकरी विमा कंपनी, शासन व न्यायालय अशा प्रक्रियेतील न्यायाची वाट पहात बसला आहे. यातच शासनाने खरीप अनुदान जाहीर करून त्याची दोन टप्प्यात विभागणी केली. यातील दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होऊन काहींना मिळाली तर आजही अनेकजण अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा बँकेत खाती असलेल्या अनेकांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी बँक, तलाठी व तहसील कार्यालयात हेलपाटे मारूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. याबाबत विचारणा केली असता बँकेत वरून पैसे आले नाहीत, तलाठी कार्यालयात आपले पासबुक, आधार कार्ड जमा केल्याचे सांगितले जाते, तर तहसील कार्यालयात अनुदान लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल, अशी उडवाउडवीची ठरावीक उत्तर देण्यात येत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसात थोडा हातभार लागेल या आशेने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असताना तहसील कार्यालयाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तातडीने अनुदान मिळवून देण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...