आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. यंदा मुबलक पावसाचा फायदा उत्पन्न वाढवण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे. खरिपात अवकाळीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी कडधान्याच्या पेरणीवर भर देत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कडधान्याचा अधिक पेरा केला आहे.
ऊस तोडणी होताच आंतरपीक म्हणून उसाच्या सरीत उन्हाळी सोयाबीन, राजमा, हरभरा आदी पिकांची पेरणी केली जात आहे. कांदा लागवडही होत आहे. उन्हाळी सोयाबीनच्या पेरणीला उशिर झाला तरी सोयाबीन उत्पादनाला कोणताही धोका नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरच पडणार आहे. ऊस बहरात येत असतानाच सोयाबीन, राजमा, हरभरा व कांदा काढणीला येतो. यामध्ये राजमा हे पीक इतर पिकापेक्षा लवकर काढणीला येते. शेतकऱ्यांनी राजमा पिकास प्राधान्य दिले आहे. उसाची मशागत करत असतानाच सहज हे पीक घेता येते.
ऊस तोड होताच मशागत व पेरा
यंदा ऊस तोडणीला उशिर झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले होते. मात्र, याच संकटाचे संधीत रुपांतर केले जात आहे. ऊसतोड होताच या क्षेत्रातील सऱ्या रिकाम्या होतात. ट्रॅक्टरने मशागत करुन सोयाबीनसह इतर पिके घेतली जात आहे.
आंतरपिकाचा फायदा काय?
ऊसाची लागवड रुंद सरी वरंबा पद्धतीने होते. उसाच्या दोन सरींमध्ये ५ ते ६ फुटांचे अंतर राहते. याच सरीमध्ये मशागत करुन सोयाबीनसह इतर पिकांचा पेरा केला केल्याने शेतकऱ्यांना एकाचवेळी दुहेरी उत्पादन घेता येते. शिवाय ऊस बहरात येताच सोयाबीन काढणीला येते. ऊसाची मशागत करतानाच हे पीक सहज घेता येते. त्यामुळे शेतकरी प्रयोग करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.